मुंबई : पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) घुसखोरी करणाऱ्या बिलाल तेली (२२) या तरुणाला अखेर गुन्हे शाखेने अटक केली. त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मागील आठवड्यात १७ जून रोजी तो संस्थेच्या परिसरात आढळल्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र त्याच्यावर किरकोळ गुन्हा दाखल करून नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. मात्र हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्यावरील गुन्ह्यांच्या कलमांत वाढ करण्यात आली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत.

अंधेरीमधील पवई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आहे. बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) १७ जून रोजी बेकायदेशीरपणे संस्थेच्या व्याख्यानाला बसला होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तो २ ते ७ जून आणि १० ते १७ जून या कालावधीतही आयआयटीच्या परिसरातील वसतिगृहात बेकायदेशीरपणे वास्तव्य केले होते. तो ४ जून रोजी पहिल्यांदा आयआयटीच्या विभागप्रमुख शिल्पा कोटीवाल यांना दिसला होता. त्याला हटकल्यावर तो पळून गेला होता. या घटनेमुळे आयआयटीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान, पवई पोलिसांनी १७ जून रोजी त्याच्याविरोधात बेकायदेशीरपण संस्थेच्या वास्तूत प्रवेश केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३) आणि ३२९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात केवळ ७ वर्षांहून कमी शिक्षा असल्याने त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. हा प्रकार गंभीर असल्याने प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बिलाल शेखविरोधातील कलमांत वाढ केली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) त्याला अटक केली असून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी कऱण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस ) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे बिलाल तेली ?

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) मुळचा कर्नाटकामधील मंगळूर येथील रहिवासी आहे. १२ वी उत्तीर्ण असलेल्या तेलीने सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. केवळ तंत्रज्ञानाची आवड असल्याने आयआयटीमधील व्याख्यानाला आपण हजर रहायचो, असे त्याने सांगितले. त्याच्या मोबाइलमध्ये सिग्नल, इमो सारखे ॲप आहेत. आयआयटी परिसरातील अनेक छायाचित्रे त्याच्या मोबाइलमध्ये आढळली आहेत. केवळ समाजमाध्यमवार पोस्ट करण्यासाठी ही छायाचित्रे काढल्याचा दावा त्याने केला.