मुंबई : कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयामुळे सध्या मुंबईतील वातावरण ढवळून निघाले आहे. दादरचा कबुतरखाना हा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याठिकाणी कोणीही कबुतरांना खाद्य घालू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. मात्र कबुतरखाना ट्रस्टनेही एक फलक लावला आहे. कबुतरांना सकाळी ६ ते ८ या वेळेत खाद्य देण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडे मागण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. ही परवानगी मिळत नाही तोपर्यंत खाद्य घालू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
दादरचा कबुतरखाना हा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सामाजिक, राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. कबुतरखाना बंद करण्यास जैन समुदायाने आणि पक्षीप्रेमींनी कडवट विरोध केला आहे. मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालायने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली होती. तसेच खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिकेच्या पथकाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जैन समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
अखेर पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यात यावे व कबुतरखाना बंद करू नये असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे जैन समुदायाने आक्रमक होत दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून टाकली होती. तर अनेक ठिकाणी जैन समुदायातील लोकांनी अनधिकृतपणे नियम मोडून कबुतरांना खाद्य घालण्यास सुरूवात केली आहे. त्यात गिरगाव चौपाटीवर एका व्यक्तीने दहा गोण्या खाद्य टाकल्याची घटना उघडकीस आली होती. तर रविवारी एका व्यक्तीने चार चाकी गाडी उभी करून त्यावर कबुतरांना धान्य घातले.
दरम्यान, आता दादर कबुतरखाना ट्रस्टनेच एक फलक कबुतरखान्याजवळ लावला आहे. यात ट्रस्टने मुंबई महापालिकेकडे अर्ज करून कबुतरांना ठराविक वेळेत खाद्य घालण्याबाबत परवानगी मागितली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही अर्ज आपल्याकडे अद्याप आलेला नाही असे त्यांनी सांगितले.
काय म्हटले आहे फलकावर
उच्च न्यायालयाने ७ ऑगस्ट रोजी कबुतरखाना ट्रस्टला कबुतरांना अन्न देण्याकरीता आम्हाला महापालिकेकडे अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी कबुतरखाना ट्रस्टने मुंबई महापालिकेकडे लेखी अर्ज केला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकाळी ६ ते ८ या वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र अद्याप लेखी परवानगी दिेली नसल्यामुळे तोपर्यंत नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत कबुतरांना खाद्य घालू नये असे आवाहन केले आहे. सूचनेचे उल्लंघन केल्यास शासकीय यंत्रणेमार्फत कारवाई होऊ शकते अशा प्रकरणात ट्रस्ट कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही असाही इशारा देण्यात आला आहे.