सात तलावांमध्ये ५३.८६ टक्के जलसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी, विहार या तलावांपाठोपाठ मोडकसागर व तानसा हे आणखी दोन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. मोडकसागर तलाव गुरुवारी पहाटे ३.२४ वाजता, तर तानसा तलाव पहाटे ५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला. सातही धरणांत मिळून सध्या ५३.८६ टक्के जलसाठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आणि परिसरात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवडय़ात विहार व तुळशी हे मुंबई परिसरातील तलाव भरून वाहू लागल्यानंतर गुरुवारी पहाटे मोडकसागर व तानसा ही दोन धरणेही ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे मोडकसागर तलावाचे दोन दरवाजे, तर तानसा तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. मोडकसागर तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी ओसंडून वाहू लागला होता, तर तानसा तलाव २० ऑगस्ट २०२० रोजी पूर्ण भरून वाहू लागला होता. मात्र या वर्षी हे दोन्ही तलाव जुलैमध्येच भरून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात सात तलावांपैकी चार तलाव पूर्ण भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी दूर झाली आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. गुरुवारी पहाटे या सातही तलावात ७,७९,५६८ दशलक्ष लिटर म्हणजेच ५३.८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai lake modak sagar and tansa lake overflow zws
First published on: 23-07-2021 at 00:57 IST