प्रेमकथांच्या परिचित वळणापेक्षा आणि सतत त्याला विनोदी तडका देण्यापेक्षा वास्तवतेकडे झुकणारी, खरोखरच हळुवार फुलणारी कथा दिग्दर्शक अभिजीत बोंबले यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटात रंगवली आहे. अर्थात, मुंबईच्या लोकलमध्ये घडणारी कथा असल्याने त्याला अधिक जिवंतपणा आला आहे. काही काही प्रसंगांत अगदी मनाचा ठाव घेणारा हा चित्रपट एक स्वतंत्र प्रेमपट म्हणून प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत नसला, तरी किमान नेहमीच्या ठोकळेबाज प्रयत्नांपेक्षा वेगळी वाट निवडण्याचं धाडस दिग्दर्शकाने दाखवलं आहे हेही नसे थोडके…
चित्रपटाची सुरुवात काहीशी रहस्यमय पद्धतीने होते. पोलिसांनी चौकशीसाठी दर्शन आणि जीत या दोन तरुणांना बोलावलं आहे. या दोघांकडे पोलीस त्यांचा लोकलमधला मित्र आशीषविषयी कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून मग आशीष आणि त्याची मुंबईच्या लोकलमध्ये ‘मिस नायगाव’शी झालेली ओळख आणि फुलत गेलेली प्रेमकथा हळूहळू दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आशीषची प्रेमकथा रंगवताना मुळात त्याची घरची परिस्थिती, गावाकडे गहाण पडलेली शेतजमीन, वडिलांवरचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मुंबईत येऊन त्याचं काम करणं, नातेवाईकांकडून मिळणारी वागणूक आणि या सगळ्या कौटुंबिक परिस्थितीतून त्याचं पिचलं जाणं आपल्यापर्यंत पोहोचतो. मात्र, कितीही दु:ख आलं तरी हसत हसत संघर्ष करण्याचा आशीषचा स्वभाव हे त्याच्या व्यक्तिरेखेचं खरं वैशिष्ट्य आहे. त्याच्या स्वभावातला हा गोडवा कामावरच्या लोकांचं, लोकलमधील त्याच्या मित्रांचंही मन जिंकून घेतो.
आशीषच्या या व्यक्तिरेखेमुळे प्रेमकथेचं एक केंद्र खूप छान आणि टोकदार रंगवलं गेलं आहे. किंबहुना, निम्म्याहून अधिक प्रेमकथा ही आशीषच्या असण्यानेच फुलत जाते. लालबागला आत्याशी वाद झाल्यावर रोज वसईहून लोकल पकडून दादरला येणाऱ्या आशीषला एके दिवशी लोकलच्या लेडीज डब्यात ‘मिस नायगाव’ दिसते. रोज नायगावहून लोकलमध्येे चढणाऱ्या या तरुणीला आशीष ‘मिस नायगाव’ हे नाव देतो. तिच्यापर्यंत पोहोचायचं आणि आपलं प्रेम व्यक्त करायचं हा चंग बांधलेला आशीष आपल्या लोकलमधील मित्रांच्या जीत आणि दर्शनच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधून काढतो. अखेर आशीष आपल्या प्रेमापर्यंत पोहोचतो का? मिस नायगावकडे प्रेम व्यक्त करतो का? त्यांच्या लोकलमध्ये फुललेल्या या प्रेमाचं पुढे काय होतं? आणि या सगळ्यात पोलिसांचा प्रवेश का होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘मुंबई लोकल’ पाहायला हवा.
दिग्दर्शक अभिजीत बोंबले यांनी चित्रपटाची अतिशय साधी-सरळ मांडणी केली आहे. आशीषची मुख्य व्यक्तिरेखा, त्याचे मित्र, आशीषच्या वडिलांची व्यक्तिरेखा आणि ते साकारण्यासाठी योग्य कलाकारांची निवड ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. आशीषच्या भूमिकेसाठी अभिनेता प्रथमेश परब याची निवड अचूक ठरली आहे. सदा हसतमुख, कष्टाळू, प्रेमळ अशा आशीषची भूमिका प्रथमेशने अगदी तन्मयतेने साकारली आहे. त्याच्या मित्रांच्या भूमिका पृथ्विक प्रताप आणि मनमीत पेम यांनीची चोख केल्या आहेत. ‘मिस नायगाव’च्या भूमिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरला शब्दांपेक्षा नजरेतूनच अधिक व्यक्त व्हायचं आहे. सालस, सुंदर अशा मिस नायगावच्या भूमिकेने ज्ञानदाने लक्ष वेधून घेतलं आहे. आशीषच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता संजय कुलकर्णी यांच्यावर काही सुंदर दृश्ये चित्रित झाली आहेत. आधीच उल्लेख केला त्याप्रमाणे एखाद्या प्रभावी प्रेमपटासाठी आवश्यक असं पार्श्वसंगीत, अलवार प्रेमाची गाणी, उत्तम छायांकन असा सगळा तामझाम या चित्रपटात नाही. त्यामुळे एकसंध प्रेमपट म्हणून त्याचा प्रभाव मर्यादित आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकार यांच्या सहज अभिनयाने चित्रपट पाहणाऱ्याला काही प्रमाणात निश्चितच धरून ठेवतो. काही अनावश्यक प्रसंगांना कात्री लावत अजून आटोपशीर मांडणी झाली असती तर कदाचित चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. पण अतिशय भावगर्भ कथा हाताशी असूनही उगाच मेलोड्रामा आणि ठोकळेबाज मांडणीचा मोह दिग्दर्शक अभिजीत बोंबले यांनी टाळला आहे. त्यामुळे अतिशय साधी आणि वास्तवाच्या काही अंशी जवळ जाणारी ‘मुंबई लोकल’ची ही प्रेमकथा प्रेक्षकांना जवळची वाटेल.
मुंबई लोकल
दिग्दर्शक – अभिजीत बोंबले
कलाकार – प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर, संजय कुलकर्णी, पृथ्विक प्रताप आणि मनमीत पेम.