मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व महत्वाच्या रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठका झालेल्या आहेत, असं मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगून, एकप्रकारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उत्तर दिलं आहे. लोकल सुरू करण्याबाबताच निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. मनपा आयुक्त चहल यांनी केंद्रीयमंत्र्यांचा हा आरोप फेटाळून लावल्याचं दिसून आलं आहे.

“जनरल मॅनेजर, सेंट्रल रेल्वे अनिल लाहोटी गुरूवारी स्वत: माझ्या कक्षामध्ये आले होते, आमची या विषयी तासभर चर्चा झाली. त्यांनी देखील सांगितलं की आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. आपण मासिक पास दिले पाहिजे, क्यूआर कोड लावला पाहिजे आदी बाबींचा सर्व विचार करून चर्चा करून रेल्वेशी आम्ही हे मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. जेणेकरून निर्णय घ्यायला हरकत नसावी. सर्वांना विश्वासात घेऊनच आपण हे करत आहोत.” असं इक्बाल चहल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलखतीत बोलतना सांगितलं आहे.

Mumbai Local: आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी- रावसाहेब दानवे

तसेच, लोकल प्रवासासाठी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी मुंबई महापालिका घेणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासीही या अॅपचा वापर करु शकतात. पात्र प्रवाशांना पास काढून प्रवास करता येईल. पाससाठी दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

करोना संकटात सर्वसामान्यांसाठी बंद असणारी लोकल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचं जाहीर केलं. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं असून, यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे.  ते एबीपी माझाशी बोलत होते.