गर्दीच्या व कमी गर्दीच्या वेळी लोकल भाडे दरात बदल करण्याचा विचार प्रशासनाचा आहे. याशिवाय एखाद्या कारणामुळे लोकल रद्द झाल्यास त्या प्रवाशाला तिकिटाचा परतावा देण्याबाबतही विचार सुरू आहे. परंतु ही अंमलबजावणी नेमकी कशाप्रकारे करावी याविषयी रेल्वे बोर्डासोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई उपनगरी सेवेला वर्षांला १,७०० कोटी रुपयांचा तोटा होत होता. हाच तोटा गेल्या तीन वर्षांत तीन ते चार हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तोटा कमी करण्यासाठीचा असा पर्याय शोधण्यात आला आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या प्रारूप आराखडय़ात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी प्रवाशांची संख्या पाहता अॅपआधारित टॅक्सी सेवा आणि विमान सेवेच्या धर्तीवर उपनगरी रेल्वे भाडे दरांमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे. शासनाने यापूर्वीच उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो, रेल्वे, बेस्ट यांसारख्या सार्वजनिक परिवहन सेवांमधील प्रवासासाठी प्रवाशांना एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत एकच स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार संबंधित प्रत्येक विभागाकडून याची तयारी केली जात आहे. उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठीदेखील ही सुविधा असल्याने एमआरव्हीसी यावर काम करीत आहे. त्याचा एक प्रारूप आराखडा बनवून नुकताच रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. एकात्मिक तिकीट प्रणाली सुविधा येताच प्रथम ही सेवा यशस्वीरीत्या राबवण्याचा प्रयत्न एमआरव्हीसी, मध्य व पश्चिम रेल्वेकडून केला जाईल. त्यानंतरच गर्दी आणि कमी गर्दीच्या वेळी भाडे दर निश्चित करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी रेल्वे प्रशासनाच्या भाडे दराच्या सूत्रानुसार ते निश्चित होईल.
रेल्वेला काय फायदा ? –
सध्याच्या घडीला पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरी मार्गावरून दिवसाला ८० लाख लोक प्रवास करतात. यातील २० ते २२ लाख प्रवासी हे एकेरी प्रवासाचे तिकीट काढून प्रवास करतात. एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत स्मार्ट कार्ड उपलब्ध झाल्यास या प्रवाशांकडून स्मार्ट कार्डचा वापर केला जाण्याचा अंदाज प्रस्तावातून करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तिकिटासाठी लागणारा कागद व खर्च कमी होईल. तसंच स्मार्ट कार्ड उपलब्ध झाल्यास तिकीट खिडक्यांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होईल. रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर कार्यरत असणारे मनुष्यबळही वाचेल. जवळपास १,५०० ते १,८०० पर्यंत कर्मचारी कमी होतील व त्यांना रेल्वेतील अन्य जबाबदारी देण्यात येईल.
प्रस्तावानुसार, गर्दीच्या व कमी गर्दीच्या वेळी रेल्वे भाडे दरात बदल करण्यासंदर्भात सूचना केली आहे. तसे झाल्यास ओला, उबर वाहनांप्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी जादा भाडे दर निश्चित केले जातील आणि कमी गर्दीच्या वेळी मूळचेच दर आकारले जातील.