“मुख्यमंत्री work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना…”; उद्धव ठाकरेंना भाजपाने केला सवाल

मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वेधलं महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष…

mumbai local trains, mumbai local, mumbai suburban trains, when will mumbai local trains start, mumbai local trains guidelines
मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी वेधलं महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष…

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असल्यानं राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांनी निर्बंध हटवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध कधी हटवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं कार्यालये सुरू झाली असून, लोक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. असं असलं तरी सर्वसामान्यांना लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी नसल्यानं मुंबई उपनगरं उपनगरीय रेल्वेशी जोडलेल्या शहरांतील लोकांची प्रचंड हेळसांड होत आहे. प्रवासी संघटनेसह विविध राजकीय पक्षांकडून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्याची मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून भाजपाने मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आज उद्धव ठाकरेजी, मंत्रिमंडळाची बैठक आहे; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथिल करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा”, अशी मागणी उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत केली आहे.

पालक-विद्यार्थी चिंताग्रस्त… तातडीने निर्णय घ्या

“मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळां सुरु नसल्याने वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा”, अशी मागणी उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पाहणी दौऱ्यानंतरही मदत नाही… तातडीने पुनर्वसन करा

“मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी”, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai local train update demand to resume local train for all passengers bjp uddhav thackeray keshav upadhye bmh