करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेली लोकल रेल्वेचे दरवाजे साडेतीन महिन्यानंतरही उघडण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर आणि उपनगरांत करोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असली, तरी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदी कायम ठेवली. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आता भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. भाजपाने मुंबईकरांना लोकलमधून प्रवेश देण्यासाठी सविनय नियमभंग आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. मात्र, आंदोलन न केल्यानं सावंत यांनी भाजपाला लक्ष्य केलं. सचिन सावंत यांनी टीका केल्यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार पलटवार केला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत सावंत यांना प्रत्युत्तर दिलं असून, यातून लोकांना छळण्यात तुम्हाला आनंद मिळत असल्याचंच दिसत आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलं आहे. “धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडं पडलं. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थापडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही”, असा उलट सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

Mumbai local : मुख्यमंत्री नाही म्हणाले नाहीत, तर…; लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

“लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलनं झाली की, मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवता, पण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे”, असा इशाराही उपाध्ये यांनी काँग्रेसला दिला.

“मुख्यमंत्री साहेब, शिव पंख लावून दिलेत, तर लोकांना कामावर जाता येईल; तुम्ही हे करू शकता”

सचिन सावंत काय म्हणाले होते?

महाराष्ट्र भाजपाने २ ऑगस्टला जाहीर केलेल्या सविनय नियमभंग आंदोलनातून पळ काढला. ब्रिटिशांविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन देश करत होता, तेव्हाही पळ काढला होता. प्रामाणिकपणा तेव्हाही नव्हता, आताही नाही. जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते. दुटप्पी भाजपाला ओळखलेली जनता आमच्याबरोबर आहे”, अशी टीका सावंत यांनी केली होती.