रेल्वे वाहतूकच नाही, तर रस्ते तसेच हवाई वाहतुकीचाही कणा म्हणजे सिग्नल! दर दिवशी मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा संबंध या सिग्नलशी येत असतो. दारात उभ्या असणाऱ्या लोकांकडे पाहून लाल-हिरवे डोळे वटारणाऱ्या या सिग्नलच्या दिव्यांमागे नेमकं काय असतं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणी एक बालगीत म्हणायला शिकवलं होतं. ‘आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू, खांबावरून वाहनांची गंमत आम्ही पाहू’! ही खांबावरून वाहनांची गंमत पाहणाऱ्या सिग्नलबद्दल जवळपास प्रत्येकालाच लहानपणापासून कुतुहल असतं. एका खांबावर असलेल्या लाल-हिरव्या-पिवळ्या दिव्यांना नेमकं कधी पेटायचं, हे कसं कळतं, हा प्रश्न लहानपणापासून अनेकांना पडला असेल. त्यात मुंबईकरांचं आयुष्य अनेकदा लहानपणापासूनच रेल्वेशी जोडलं असल्याने रेल्वे मार्गावरील सिग्नल हादेखील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकदा चिडचिडीचाही! पण सिग्नल हा वाहतुकीतील अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने त्याबद्दल थोडी माहिती करून घेतल्यानंतर सिग्नल यंत्रणा किती रोचक आणि मनोरंजक आहे, हे लक्षात येतं.
लहानपणी या बालगीताबरोबरच एक प्रश्नही विचारला जायचा. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेत एकूण किती सिग्नल आहेत? या प्रश्नाचं हमखास उत्तर ‘सोप्पंय.. तीन! लाल, हिरवा आणि पिवळा!’ असं दिलं जायचं. पण खरंच उपनगरीय रेल्वेमार्गावर मध्य रेल्वेवर किती सिग्नल आहेत, याची माहिती आहे का? कुतूहल नक्कीच असेल ना! त्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल. पण त्याआधी एक गोष्ट, रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत चार सिग्नल असतात. लाल-पिवळा-हिरवा आणि पिवळा!
रेल्वे एकंदरीत कामकाजात या सिग्नलचा वाटा खूप मोठा आहे. लोकल किंवा इंजिन कोण चालवतं, याचं उत्तर स्वाभाविकपणे मोटरमन किंवा लोको पायलट (इंजिन ड्रायव्हर हा शब्द रेल्वेमध्ये कोणीच वापरत नाही.) असं येतं. पण गाडीचं नियंत्रण ही सिग्नल यंत्रणा करत असते. उपनगरीय क्षेत्रात प्रत्येक ४०० ते ४५० मीटरच्या अंतरावर एक सिग्नलचा खांब असतो. प्रत्येक खांबावर सर्वात खाली लाल, त्यावर पिवळा, त्यावर हिरवा आणि सर्वात वर पिवळा, असे चार दिवे असतात. यातील प्रत्येक दिवा पेटतो, तेव्हा तो काहीतरी संदेश मोटरमन किंवा लोको पायलट यांना देत असतो. प्रत्येक सिग्नल खांबापुढील १२० मीटरचा भाग ट्रॅक सíकट म्हणून ओळखला जातो. म्हणजे गाडी त्या सिग्नलच्या कक्षेत येत असताना सिग्नल हिरवा किंवा दोन पिवळे दिवे असतात. गाडी त्या सिग्नलच्या कक्षेत येऊन या ट्रॅक सíकटच्या, म्हणजेच १२० मीटरच्या पुढे गेली की, हा सिग्नल लाल होतो. मोटरमन कोचपासून तिसऱ्या डब्याच्या दरवाज्यात उभ्या राहिलेल्या प्रवाशांनी ही गोष्ट अनेकदा बघितली असेल. हा सिग्नल लाल झाला की, त्या ४००-४५० मीटरच्या ट्रॅक सेक्शनमध्ये दुसऱ्या एखाद्या गाडीला येण्यास मज्जाव असतो.
ही गाडी पुढल्या सिग्नलच्या कक्षेत पोहोचली आणि त्या सिग्नलच्या पुढे १२० मीटरचं अंतर ओलांडलं की, त्या सिग्नलच्या मागच्या सिग्नलवर एक पिवळा दिवा लागतो. तिसऱ्या सिग्नलच्या ट्रॅक सíकटपुढे गाडी गेली की, पहिल्या सिग्नलवर दोन पिवळे दिवे लागतात. आणि गाडीने चौथा सिग्नल ओलांडला की, पहिला सिग्नल हिरवा होतो. यासाठी तांत्रिक परिभाषेत दोन सíकटमध्ये पहिल्या सíकटमधून प्रवाह दुसऱ्या सíकटकडे पाठवला जातो. या सíकटला तो विद्युतप्रवाह मिळाला की, ते सर्किट सिग्नल नियंत्रण कक्षाकडे हा संदेश मिळाल्याचा संदेश पाठवते. हे काम अव्याहत सुरू असतं.
आता हे चार सिग्नल नेमके मोटरमन वा लोको पायलटला काय सांगतात, ते पाहू. लाल सिग्नल सांगतो की, पुढे जाण्यास अजिबात परवानगी नाही. एक पिवळा दिवा म्हणतो की, हळू जा कारण पुढला सिग्नल लाल आहे. दोन पिवळे दिवे सांगतात, पुढला सिग्नल पिवळा असला, तरी त्यापुढील लाल आहे. आणि हिरवा दिवा सांगतो की, तुम्हाला परवानगी दिलेल्या सर्वाधिक वेगात गाडी पुढे जाऊ शकते.
सिग्नलचा खांब ज्यांनी निरखून बघितला असेल, त्यांना त्या खांबावर एक पांढरा फलक टांगलेला दिसेल. या फलकावर इंग्रजीतील ‘ए’ अक्षर लिहिलेलं असतं. याचा अर्थ हा सिग्नल पूर्णपणे ऑटोमॅटिक म्हणजेच स्वयंचलित यंत्रणेवर चालू आहे. त्याशिवाय काही खांबांवर ‘ए’ असे अक्षर असलेला दिवाही असतो. या दोन गोष्टींना रेल्वे वाहतुकीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वयंचलित सिग्नल लाल असेल, तर मोटरमनने त्या सिग्नलच्या मागे गाडी थांबवणे अपेक्षित आहे. साधारण एक मिनिट गाडी थांबवूनही सिग्नल पिवळा झाला नाही, तर मोटरमन १५ किमी प्रतितास एवढय़ा कमी वेगाने गाडी पुढे सरकवू शकतो. अनेकदा सिग्नलला गाडी थांबते आणि मग हळूहळू पुढे सरकते, यामागे हे कारण असतं.
पॉइंट्स फेल्युअर म्हणजे काय रे भौ?
अनेकदा रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडांमुळे खोळंबते. बऱ्याचदा हा तांत्रिक बिघाड म्हणजे पॉइंट फेल्युअर किंवा पॉइंटमध्ये खराबी असल्याचे उद््घोषक सांगतात. पण म्हणजे नेमकं काय होतं, ते कधीच प्रवाशांना कळत नाही. रेल्वेच्या एका रुळावरून दुसऱ्या रुळावर जाण्यासाठी काही स्थानकांच्या आगेमागे क्रॉसओव्हर पॉइंट्स असतात. पूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये रुळांची दिशा बदलण्यासाठी एक मोठा खटका खेचत असल्याचं दाखवलं जायचं. हाच तो रेल्वेच्या परिभाषेतला पॉइंट! गाडीची दिशा बदलताना म्हणजेच गाडी एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळवताना रुळांचे सांधे योग्य पद्धतीने बदलले जाणं आणि ते बदलल्यानंतर ते लॉक असणं महत्त्वाचं असतं. अनेकदा या सांध्यांमध्ये दगड अडकतात, कधी काही कचरा अडकतो. अशा वेळी बदललेल्या सांध्यामध्ये ३ मिमीपेक्षा जास्त जागा राहत असेल, तर ती रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक असते. अशा वेळी पॉइंट फेल झाला, असे म्हणतात. या वेळी सिग्नल लाल राहत असल्याने गाडी हळूहळू पुढे चालवावी लागते.
याला म्हणतात ए मार्कर..
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यावर अनेकदा दुसऱ्या दिवशी छापून येणाऱ्या बातम्यांमध्ये, ‘गाडय़ा ए मार्करवर चालवण्यात आल्या’, असा उल्लेख असतो. पण ए मार्कर म्हणजे नेमकं काय असतं, ते अनेकदा कळत नाही. एखाद वेळी सिग्नल यंत्रणेला रुळांबरोबर जोडणारी तांब्याची तार भुरटे चोर कापून नेतात किंवा एका ट्रॅक सíकटपासून दुसऱ्या ट्रॅक सíकटपर्यंत जाणारा प्रवाह अनेक कारणांमुळे खंडित होतो. अशा वेळी सिग्नल नियंत्रण कक्षाला यंत्रणेकडून काहीच संदेश मिळत नाहीत आणि सर्व सिग्नल लाल असल्याचे दिसते. अशा वेळी सिग्नलच्या खांबावरचा तो ‘ए’ अक्षर असलेला दिवा लागतो आणि मोटरमन ताशी १५ किमी या वेगाने गाडय़ा सावकाश पुढे नेतात.
ता. क. – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सिग्नलचे एकूण १९०० खांब आहेत. या खांबांच्या पुढे असलेल्या ट्रॅक सíकटची संख्या ४५०० एवढी आहे.
रोहन टिल्लू – rohan.tillu@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local trains passengers and signal
First published on: 03-08-2016 at 01:48 IST