प्रेमात नकार दिल्यानंतर २१ वर्षीय विद्यार्थिनीच्या घऱी सेक्स टॉईज पाठवणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या तरुणीने नकार दिल्यानंतर २६ वर्षीय आरोपी कुणालने तिच्या घरी सेक्स टॉईज पाठवण्यास सुरुवात केली होती. इतकंच नाही तर तिचा मोबाइल नंबर पॉर्न साइटवर अपलोड केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होता. अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण –
आरोपी कुणाल गेल्या अनेक महिन्यांपासून शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला ई-कॉमर्स वेसबाईटच्या माध्यमातून सेक्स टॉईज पाठवत होता. यावेळी तो कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार सुरु केला होता.
फेब्रुवारी महिन्यात तरुणीने मालाड पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. सायबर केस असल्याने पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवलं.
पोलिसांचा तपास –
पोलिसांनी सर्वात प्रथम कुरिअर कंपनीच्या माध्यमातून आरोपीचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने कुठेही आपलं नाव किंवा पत्ता दिलेला नव्हता. यानंतर पोलिसांनी व्हीपीएन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी सेक्स टॉईज पाठवल्यानंतर प्रत्येक वेळी आपला आयपी अॅड्रेस बदलत होता. पोलिसांनी सेवा देणाऱ्या परिसरातील जवळपास ५०० जणांची माहिती मिळवली होती. अखेर पोलिसांनी आरोपीचा पत्ता मिळवला आणि त्याला अटक केली.