बाईकवरून तब्बल २४ हजार किलोमीटरची जगप्रदक्षिणा करणाऱ्या मुंबईतील एका तरुणाच्या बाईकची इंग्लंडमध्ये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. युनायटेड किंग्डमच्या नॉटिंगहॅम शहरात या तरुणाची ही बाईक दिवसाढवळ्या चोरीला गेली आहे. त्यामुळे या तरुणाची ‘वर्ल्ड टूर’ अचानक थांबली आहे.

या तरुणाचं नाव योगेश असं असून तो तब्बल ११८ दिवसांपासून प्रवास करत होता. १ मे २०२५ रोजी मुंबईहून प्रवासाला सुरूवात केली होती. त्याने १७ देशांमध्ये २४,००० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास केला आहे. मात्र, आता त्याची केटीएम बाईक नॉटिंगहॅम शहरातून चोरीला गेल्यामुळे त्याचा पुढचा प्रवास थांबला आहे. नॉटिंगहॅममध्ये तो नाश्ता करण्यासाठी थांबला असता त्याची बाईक चोरीला गेली आणि योगेशला धक्का बसला. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, चोरीला गेलेल्या त्या बाईकमध्ये त्याची आवश्यक कागदपत्रे होते. तसेच योगेशला आता त्याचा पुढचा प्रवास आफ्रिकेला करायचा होता. मात्र, मध्येच बाईक चोरीला गेली, एवढंच नाही तर त्या गाडीबरोबर त्याचा पासपोर्ट, पैसे, कागदपत्रांसह आदी काही महत्वाच्या वस्तूही गेल्या आहेत. आता तो त्याची हरवलेली बाईक आणि कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सध्या तरी त्याच्यासमोर भारतात परतण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्याच्या बाईकचे फोटो फोरमवर शेअर करण्यात आल असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

लोकांना मदत करण्याचं आवाहन

“मी मुंबईवरून माझी मोटारसायकल घेऊन निघालो आणि त्यानंतर लंडनला पोहोचलो. मात्र, आज अचानक माझी बाईक चोरीला गेली. त्यात माझे सर्व साहित्य होते”, असं योगेशने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने आरोप केला की त्याची बाईक चार लोकांच्या गटाने चोरली आहे. तसेच चोरांनी बाईक चोरून घेऊन जात असतानाचे काही सीसीटीव्ही फुटेजची एक क्लिपही शेअर केली आहे.

दरम्यान, युनायटेड किंग्डममध्ये जगातील प्रवाशांच्या बाईक चोरीला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर असलेल्या एका व्यक्तीबरोबरही असाच प्रकार घडला होता. आता योगेश १४ ऑगस्ट रोजी युकेला पोहोचला होता. दरम्यान, रविवारी त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्याने त्याच्या फॉलोअर्सना तो ऑक्सफर्ड रेल्वे स्थानकावर असल्याचं सांगितलं होतं. “मी आता लंडनला जात आहे आणि माझी परिस्थिती खूप वाईट आहे”, असं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, अनेक लोकांनी त्याला मदतीसाठी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सूचना केली आहे.