Mumbai Metro Line 2B Trial: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले असा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता मात्र हा टप्पा डिसेंबरऐवजी सप्टेंबरअखेरीसच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. कारण या पहिल्या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षाच्या (सीएमआरएस) पथकाकडून बुधवारपासून बांधकामाच्या (सिव्हिल वर्क) चाचण्यांना सुरुवात होणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत डायमंड गार्डन – मंडाले टप्पा सप्टेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘अंधेरी पश्चिम – मंडाले असा मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. २२ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. मंडाले – डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन – मंडाले असे हे दोन टप्पे आहेत. या दोन टप्प्यातील डायमंड गार्डन – मंडाले टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला वेग देऊन एप्रिल २०२५ मध्ये डायमंड गार्डन – मंडालेदरम्यान मेट्रो गाड्यांच्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे.
तर आता एमएमआरडीएने हा टप्पा डिसेंबरआधीच, येत्या काही दिवसांत अर्थात सप्टेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल एमएमआरडीएकडून टाकण्यात आले आहे. ते म्हणजे एमएमआरडीएने या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्यादृष्टीने बुधवारपासून सीएमआरएस पथकाकडून बांधकामाच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मेट्रो मार्गिकेच्या संचलनातील हा एक महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा असतो. त्यामुळे ही चाचणी यशस्वी होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या १०-१५ दिवसात सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन डिसेंबरमध्ये डायमंड गार्डन – मंडाले मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास पूर्व उपनगरातून धावणारी ही पहिली मेट्रो मार्गिका असणार आहे.