मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान दुर्घटना आणि अपघातांची मालिका सुरुच आहे. शनिवारी मिरारोडच्या साईबाबा नगर येथे कामादरम्यान एका कर्मचाऱ्याचा ६५ फुटावरुन पडून मृत्यू झाला आहे. या मार्गिकेच्या कामादरम्यान आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण सहा जणांनी जीव गमावला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेचे काम सुरु आहे. या कामाचे कंत्राट जे कुमार कंपनीकडे आहे. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास साईबाबा नगर येथील मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान सुपरवायझर फरहान तहजीब अहमदने (४२ वर्ष) स्थानकावर एका बाजूला पडलेले लोखंडी पट्ट्या उचलून नेण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. या लांब लोखंडी पट्ट्या उचलून नेताना लोखंडी पट्ट्या फरहानच्या दिशेने आल्याने त्या लागू नयेत म्हणून फरहान मागे झाला आणि त्याचा तोल जाऊन ६५ फुटावरुन खाली पडला. त्याला तात्काळ भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी मेट्रोच्या कामादरम्यान उंचावरुन पडून मृत्यूची झाल्याची नोंद मिरारोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन जिंकलवाड यांनी लोकसत्ताला दिली. प्रकल्पस्थळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या की नाही याचा तपास सुरु आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान आतापर्यंत अनेक छोटेमोठे अपघात झाले आहेत. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार मे २०२५ पर्यंत विविध दुर्घटनांमध्ये पाच मृत्यू झाले आहेत. शनिवारच्या घटनेनंतर ही संख्या सहावर गेली आहे. उंचावर काम सुरु असताना खाली सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या नव्हत्या का, सुरक्षेच्या उपाययोजना तेथे नव्हत्या का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. दरम्यान याविषयी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.