माहीम, दादरसारख्या भर नागरी वस्तीखालून ५ किलोमीटरचे भुयार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय मांडवकर, मुंबई</strong>

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या ‘मेट्रो-३’ भुयारी मार्गिकेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण होणार आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये सर्वप्रथम माहीम येथील नया नगरमधून भूगर्भात सोडलेल्या दोन टनल बोअरिंग मशिन (टीबीएम) गुरुवारी सकाळी एकाच वेळी दादर शिवसेना भवन येथे बाहेर पडणार आहेत.

गेल्या वर्षभरात या दोन यंत्रांनी माहीम, दादरसारख्या भर नागरी वस्तीखालून ५ किलोमीटरचे भुयार खोदले आहे. कुलाबा ते सीप्झ या भारतातील पूर्ण स्वरूपातील मेट्रो मार्गिकेचे काम सध्या मुंबईत वेगाने सुरू आहे. भुयारीकरणासाठी १७ टीबीएम यंत्रे कार्यान्वित आहेत. या यंत्रांना जमिनीत उतरविण्यासाठी मार्गिकेतील स्थानकांच्या ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आली आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आजवर दोन भुयारांचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये सीप्झ ५६८ मीटरच्या  आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील विवरामध्ये १.२६ किमीच्या भुयाराचा समावेश आहे. मात्र या प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी सर्वप्रथम जमिनीत सोडलेल्या दोन टीबीएम यंत्रांच्या आधारे ५ किमीचे भुयारीकरण गुरुवारी सकाळी पूर्ण होणार आहे.

माहीम येथील नया नगर येथील विवरात सप्टेंबर २०१७ मध्ये कृष्णा १ आणि कृष्णा २ ही टीबीएम यंत्रे उतरविण्यात आली होती. या यंत्रांना दादर शिवसेना भवन मेट्रो स्थानकापर्यंतची २.५ किमी लांबीची दोन भुयारे खोदण्याचे काम पूर्ण करायचे होते. यातील कृष्णा १ या यंत्राने नोव्हेंबर २०१७ मध्ये भुयारीकरणाचे काम सुरू केले.

त्यानंतर कृष्णा २ यंत्र कार्यान्वित झाले. आता १४ महिन्यांनंतर प्रत्येकी २.५ किमीचे भुयारीकरण पूर्ण करून ही दोन यंत्रे गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेना भवन येथील विवरातून बाहेर पडणार असल्याची माहिती मेट्रो-३ प्रशासनातील (एमएमआरसी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

यंत्रे १५ मिनिटांच्या अंतराने भुयारीकरण पूर्ण करून भूगर्भातून बाहेर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृष्णा-१ला थांबा

यातील कृष्णा १ या टीबीएम यंत्राचे नियोजित काम डिसेंबरमध्येच पूर्ण झाले होते. मात्र ते बाहेर काढण्याकरिता शिवसेना भवन येथील विवर तयार झाले नसल्याने त्याला जमिनीखालीच ‘थांबा’ दिला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामागून भुयारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केलेल्या कृष्णा २ यंत्राचे काम पूर्णत्वाच्या दिशेने पोहचले आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रांना एकत्रितपणे जमिनीखालून काढण्याचे काम गुरुवारी सकाळी करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro line iii important phase completed
First published on: 31-01-2019 at 01:55 IST