मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत एमएमआरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र बनविले जाणार आहे. यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. एमएमआरला आघाडीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनविण्याचेही उद्दिष्ट ग्रोथ हबअंतर्गत ठेवण्यात आले आहे.

ग्रोथ हबच्या आराखड्यानुसार अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील नवनगरात अर्थात तिसऱ्या मुंबईत आणि नैना प्रकल्पात अंदाजे १०० हेक्टर जागेवर प्रत्येकी एक अशा दोन ‘एज्युसिटी’ २०३० पर्यंत उभारण्यात येणार आहेत. यात १५ अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन वा तीन विधि महाविद्यालये, पाच वा सहा वैद्याकीय, तसेच फार्मसी महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांचा समावेश असणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे वडाळ्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापार केंद्रात एक व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए) महाविद्यालयाचेही नियोजन करण्यात येणार आहे. त्याचवेळी देश-विदेशातील २० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी एमएमआरकडे आकर्षित करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

१५ अभियांत्रिकी, सहा वैद्याकीय महाविद्यालये

● एमएमआरडीएच्या शैक्षणिक केंद्राच्या आराखड्यानुसार २०३० पर्यंत एमएमआरमध्ये २५ ते ३० नवीन महाविद्यालये बांधण्यात येणार आहेत. यात १५ अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन ते तीन प्लॅनिंग महाविद्यालये, दोन ते तीन विधि महाविद्यालये, एक वा दोन कला महाविद्यालये आणि पाच ते सहा वैद्याकीय, तसेच फार्मसी महाविद्यालये यांचा समावेश असणार आहे.

● वडाळा व्यापार केंद्रात एक व्यवस्थापन अभ्यासक्रम महाविद्यालयाची तरतूद केली आहे. या महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी अतिरिक्त २० हजार विद्यार्थ्यांना एमएमआरकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. या महाविद्यालयाची उभारणी नेमकी कशी केली जाणार, हे सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतर स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैनामध्ये एक ‘एज्युसिटी’

ग्रोथ हबमध्ये एमएमआरला आघाडीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही विकसित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून तिसऱ्या मुंबईत एक आणि नैनामध्ये एक एज्युसिटी विकसित केली जाणार आहे. अंदाजे १०० हेक्टर जागेवर ही एज्युसिटी असणार आहे. यात महाविद्यालयांसह विद्यार्थी वसतीगृह, खेळाची मैदाने, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दुकाने आणि इतर सुविधांचाही समावेश आहे.