मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवेवर प्रचंड ताण येऊ लागला असून प्रवाशांना प्रवास करणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिक ॲप आधारित टॅक्सीकडे वळू लागले आहेत. परंतु, सलग सुट्ट्यांमुळे ही सेवा मिळणे कठीण झाले असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सलग सुट्ट्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने ॲप टॅक्सी चालक सेवा देण्यास नकार देत आहेत. तर, इच्छितस्थळी जाण्यास ॲप टॅक्सीची सेवा मिळत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. १५ ते १७ ऑगस्टदरम्यान सलग सुट्ट्यांमुळे ॲप आधारित टॅक्सी सेवा मंदावण्याची चिन्हे आहेत.

स्वतःचे वाहन चालविल्यास इंधन, वाहन देखभाल आणि वाहन वाहनतळाचे शुल्क भरावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी ॲप आधारित टॅक्सीचा प्रवास सोयीस्कर ठरतो. परंतु, सणासुदीच्या दिवशी ॲप आधारित टॅक्सी तासंतास वाट पाहूनही येत नाही. प्रवासी जादा पैसे देण्यास तयार असतानाही ॲप आधारित टॅक्सी येत नाही. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या वाहनाने प्रवास करावा लागतो. खासगी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावरून धावू लागताच वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. यात वेळ, पैसा दोन्हीचा अपव्यय होतो.

ॲप टॅक्सी चालकाचे म्हणणे काय…

सरकारने भाडेदरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे कमी भाड्यात ॲप टॅक्सी चालवणे अवघड झाले आहे. इंधनाचे वाढलेले दर, टॅक्सीची देखभाल-दुरूस्ती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ‘ओन्ली मीटर’ या संकेतस्थळावरून भाडे आकारणी सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांबरोबरच चालकांचाही फायदा होईल. प्रवाशांना वेळेत टॅक्सी मिळेल आणि विनाअडथळा प्रवास होईल. तर, चालकांना योग्य भाडे मिळेल आणि त्यांच्या आर्थिक समस्या सुटतील, असे ॲप आधारित टॅक्सी चालक अनुराग गुप्ता यांनी सांगितले.

तर प्रवाशांना योग्य सेवा देता येईल…

वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी ॲप आधारित टॅक्सी आरक्षित होत नाही. वाहतूक कोंडीमुळे टॅक्सी चालक भाडे घेत नाहीत. परंतु ॲप आधारित टॅक्सी चालकाला योग्य मोबदला दिल्यास ते भाडे स्वीकारतील. काही अंतरावर जादा भाडे घेऊन टॅक्सी सुविधा मिळते. मात्र जादा भाडे घेणे ही एक प्रकारे लाच आहे. टॅक्सी भाडे दर निश्चित असणे आवश्यक आहेत. मीटर टॅक्सी, रिक्षा वाहतूक कोंडीत अडकल्यास मीटरद्वारे दर वाढतात. परंतु, ॲप टॅक्सीला अशाप्रकारचे मीटर नाहीत. स्पर्धात्मक युगात अनेक नवनवीन ॲप आधारित टॅक्सी सेवेत येत आहेत. परंतु, या ॲप सेवा नवनवीन योजना आणतील. परंतु, त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सीचे दर निश्चित करणे आवश्यक आहे. तेव्हाच, प्रवाशांना योग्य, वेळेत सेवा देता येईल, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.