मुंबई : पश्चिमी वाऱ्याच्या झंझावातामुळे समुद्राचे तापमान वाढल्याने आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने शुक्रवारी किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पुन्हा वाऱ्यांचा प्रभाव वाढला असून उत्तरेकडील थंडीची लाट राज्याच्या दिशेने येत आहे. त्यामुळे मुंबई गारेगार झाली.
शनिवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदवले. शुक्रवारच्या तुलनेत ४.२ अंशाने किमान तापमान कमी झाले. पुढील दोन दिवस तापमानात घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारताच्या वरील भागात हिमवृष्टीमध्ये वाढ होत असल्याने थंडी वाढली. हिमवृष्टीमुळे शीत वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगाने वाहू लागले आहेत. त्याचा प्रभाव मुंबईत दिसत असून किमान आणि कमाल तापमानात घट होत आहे. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने कमी नोंदवले.
कडाक्याच्या थंडीची शक्यता
हिमवर्षांवाचे प्रमाण आणखी वाढल्यास कडाक्याची थंडीची शक्यता आहे. तसेच, पुढील दोन दिवस मुंबईतील किमान तापमान १५ अंशाखाली राहण्याची शक्यता हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी वर्तवली.