भाजपा आमदार अमित साटम यांच्यावर एका महापालिका अभियंत्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर या फोनचे एक रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये आमदार अमित साटम अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचा कथित आरोप आहे. आमदार साटम यांनी पैसे उकळण्यासाठी धमकी दिल्याचा दावाही अभियंत्यांनी केला आहे. मात्र अमित साटम यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. क्लिपच्या सुरुवातीचा आवाज माझा आहे मात्र पुढे शिवीगाळ करतानाचा आवाज ‘मॉर्फ’ किंवा ‘एडिट’ करण्यात आला आहे. काहीही कारण नसताना मला या प्रकरणात गोवले जात आहे असे अमित साटम यांनी म्हटले आहे.
एकीकडे हा वाद संपत नाही तोच अमित साटम यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अमित साटम फेरीवाले हटवण्यासाठी शिवीगाळ करताना दिसत आहेत. मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या फेरीवाल्यांना अमित साटम अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत हे या व्हिडिओत दिसते आहे. पोलिसांना उद्देशून बोलत असताना अमित साटम फेरीवाल्यांना शिवीगाळ करत आहेत आणि लाथा बुक्क्यांनी मारहाणही करत आहेत. फेरीवाल्यांना शिव्या देताना, अमित साटम पोलिसांवर चांगलेच संतापले होते. फेरीवाले तुमचे ऐकत नाहीत? हे कसे काय मान्य करणार? तुमचे काम आता मी करतो मला तुमचा पगार द्या आणि माझ्यावर एफआयआरही दाखल करा असे अमित साटम यांनी पोलिसांना ठणकावले आहे. या सगळ्या प्रकरणावर अमित साटम काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी भाजपाच्या श्रीपाद छिंदम याची उपमहापौरपदावरून आणि भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरत शिवीगाळ केली होती. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपाने त्याची हकालपट्टी केली. ते प्रकरण मिटत नाही तोच हा नवा वाद समोर आला आहे.
फोनवर झालेल्या शिवीगाळ प्रकरणासंदर्भात अमित साटम यांचे स्पष्टीकरण समोर आले आहे. के-पश्चिम वॉर्डमधील कनिष्ठ अभियंता राठोड आणि सहाय्यक अभियंता पवार यांच्यासोबत झालेले हे संभाषण आहे. त्यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत. अभियंता पवार आणि राठोड यांच्याशी माझे चांगले संबंध होते त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. मी विधानसभेत ५० हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याबाबत लोकायुक्तांकडे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होण्याआधी माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच माझ्यावर दबाव आणण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असे साटम यांनी म्हटले आहे.