मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा आणि ही मार्गिका तोट्यातून बाहेर पडावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन स्वदेशी बनावटीच्या गाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. जेणेकरुन आज १५ ते ३० मिनिटांंनी धावणारी मोनोरेल प्रत्येकी सहा मिनिटांनी धावेल आणि प्रवासी संख्या वाढेल. आतापर्यंत १० पैकी ७ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. उर्वरित तीन गाड्या लवकरच मुंबईत दाखल होतील आणि या सर्व १० गाड्या डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी २० किमीचे मोनोरेल मार्गिकाही मुंबईतीलच नव्हे तर देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका आहे. चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यात मार्गिकेची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करून मोनो रेल ४ फेब्रुवारी २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमीचा टप्पा २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा टप्पा रखडला आणि अखेर फेब्रुवारी २०१९ मध्ये हा टप्पा पूर्ण झाला. संपूर्ण चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक वाहतूक सेवेत दाखल झाला. मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून या मार्गिकेला प्रतिसाद मिळत नसल्याने ही मार्गिका तोट्यात आहे.

पांढरा हत्ती म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती या प्रकल्पाची आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तोट्यातून बाहेर काढून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोनोरेलची स्थानके शक्य तिथे मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहेत. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे) तसेच मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) या मार्गिकांशी मोनोरेल जोडली जाणार आहे. असे झाल्यास प्रवासी संख्या वाढेल असा विश्वास एमएमआरडीएला आहे.

मोनोरेल मेट्रोशी जोडतानाच मोनोरेल मार्गिकेवरील गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. तर मोनोरेल गाड्यांची निर्मिती भारतातच करण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार १० मोनोरेल गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करण्यात येत असून यासाठी ५९० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदाराकडून आतापर्यंत सात गाड्यांची बांधणी पूर्ण करून या गाड्या मुंबईत दाखल करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित तीन गाड्यांची बांधणी सुरु असून या गाड्या येत्या काही दिवसातच मुंबईत दाखल होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत दाखल झालेल्या गाड्यांची चाचणी सुरु असून नव्याने दाखल होणाऱ्या गाड्यांची चाचणी घेऊन दहाही गाड्या डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली. गाड्यांची संख्या वाढल्यास गाड्यांच्या फेऱ्या वाढतील आणि आता कधी १५ मिनिटांनी वा कधी ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल गाडी डिसेंबरपासून सहा मिनिटांनी सुटेल. गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवासी मोनोरेलकडे वळत नाहीत. पण संख्या, वारंवारता, आणि फेऱ्या वाढल्यास आणि पुढे मोनोरेल स्थानके मेट्रो स्थानकाशी जोडली गेल्यास मोनोरेल मार्गिकेला नक्कीच नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे.