मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आपला परदेश दौरा रद्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आयुक्तांनी आपली रजा रद्द केली.
पालिका आयुक्त भूषण गगराणी हे मुलाच्या पदवीदान समारंभासाठी अमेरिकेला जाणार होते. त्याकरीता त्यांनी १३ मेपासून दहा दिवसांची रजा घेतली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आयुक्तांनी रजा रद्द केली.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून या शहरालाही युद्धाच्या पार्श्वभूमीवर धोका आहे. त्यामुळे नागरी सेवा सुरक्षित सुरू राहाव्यात याकरीता शुक्रवारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या. दरम्यान, भूषण गगराणी आणि अन्य सनदी अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.