मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून गोराई आणि चारकोप परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता गोराई जलाशय केंद्रात पंप बसविण्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येत्या आठवडाभरात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यामुळे या भागातील पाण्याच्या समस्या दूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, या भागात बसविण्यात आलेल्या नव्या जलवाहिन्या आठवडाभरात कार्यान्वित होणार आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील मागाठाणे (पश्चिम), दहिसरचा काही भाग, कांदिवली (पश्चिम) आणि मालाड (पश्चिम) मधील मार्वे परिसर या भागात कमी दाबाने पाणपुरवठा होत असून रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा दाब सुमारे ६० ते ६५ दरम्यान असावा लागतो. मात्र सद्यस्थितीत केवळ ४० ते ४५ दाबाच्या स्तरावर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम उपनगरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सुमारे १६,९०० मीटर लांबीच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यापैकी सुमारे १६,३०० मीटर लांबीच्या जलवाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. गोराई जलाशयात पंप बसविण्याचे काम सुरू असून ते आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. उत्तर मुंबईतील पाणीपुरवठ्यासंबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी या भागात पाण्याची दाब मापक यंत्रे बसविण्याची आदेश उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महानगरपालिकेला दिले आहेत. या यंत्रामुळे पाण्याच्या दाबात होणारे वाढ आणि घट त्वरित समजेल, तसेच गळतीचे ठिकाण शोधण्यात मदत होईल. गोयल यांनी पाणीटंचाईग्रस्त भागांचे मॅपिंग करून तात्काळ उपाययोजना करण्याच्याही सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.