मुंबई पालिकेत स्वबळावर सत्तेसाठी अमित शहा यांची दिल्लीत प्रमुख नेत्यांशी चर्चा

आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरु केली असून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचून भाजपची सत्ता आणावी, अशी राजकीय व्यूहरचना अध्यक्ष अमित शहा यांनी सुरु केली आहे. सत्ताधारी शिवसेनेला कचरा व अन्य नागरी प्रश्नांवरुन  ‘लक्ष्य’ करुन कोंडी करण्यासाठी भाजपकडून आता नियोजनबद्ध पावले टाकली जातील. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी विधानसभेप्रमाणेच अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री, अन्य राज्यांमधील नेतेमंडळींचा फौजफाटा भाजप निवडणुकीच्या िरगणात उतरविणार आहे.

शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी काहीही करुन महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपने बांधला आहे.  त्यासाठी अध्यक्ष अमित शहा यांनी लक्ष घालून रणनीती तयार केली आहे. त्याबाबत शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदी निवडक १२ नेत्यांशी शनिवारी रात्री नवी दिल्लीत बैठक घेऊन चर्चा केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून किमान निम्म्या जागा शिवसेनेने सोडल्यास युती करावी, असा पक्षाचा विचार होता. शिवसेनेकडून प्रस्ताव आला, तरच विचार केला जाणार असून शिवसेनेने आधीच सर्व जागा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपनेही स्वबळावर लढण्यासाठी पावले टाकली आहेत.

शिवसेनेने मुंबईकरांसाठी काय ‘करुन दाखविले’ , हे  भाजप जनतेपुढे उघड करणार आहे. कचराभूमीच्या आगी, कंत्राटे आणि रस्ते, नालेसफाईच्या कंत्राटांमधील भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवर आशिष शेलार, किरीट सोमय्या आदी भाजप नेत्यांनी शिवसेनेची कोंडी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे ससेमिरेही लावले आहेत. या मुद्दय़ांवर भाजप अधिक आक्रमक होणार असून शिवसेनेला ‘लक्ष्य’ केले जाणार आहे.

शेलारांकडेच जबाबदारी

शिवसेनेविरोधात जोरदार आघाडी उघडणारे शेलार यांच्याकडेच पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी त्यासाठी सोपविली जाणार आहे. मुंबईकरांसाठी मेट्रो, किनारपट्टी रस्ता, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आदी प्रकल्प व निर्णय भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबईकरांसाठी घेतले आहेत. आरोग्यसेवा व अन्य काही सुविधा पुरविण्याची मोहीम पक्षपातळीवर सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे खासदार व आमदारांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

’केंद्रीय पक्ष पातळीवरुन राज्यात समन्वय ठेवण्यासाठी राज्यमंत्री पियूष गोयल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे,

’‘वॉर रुम’ ची जबाबदारी लोढा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोचविण्यासाठी तीन मे पासून मुंबईत मोहीम हाती घेतली जाईल.