मुंबई : महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अशा आस्थापनांनी या सेवेसाठी नोंदणी करून त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करून ते महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे. या कचऱ्याच्या संकलनासाठी नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना ‘पिवळ्या कचरापेटी’चे वितरण करण्यात येणार आहे.

घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यात प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा, तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि श्रृंगार केंद्रामध्ये (ब्यूटी पार्लर) निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच तो टाकला जातो. महापालिकेच्या कचरा संकलन सेवेचा लाभ घेण्यासाठी एकूण ३ हजार ५३६ आस्थापनांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये २ हजार ९१ गृहनिर्माण संस्था, १ हजार १४६ श्रृंगार केंद्र, २८६ शैक्षणिक संस्था, ४० महिला वसतिगृह यांचा समावेश आहे. या सर्व आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे २०२ टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलित करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित कचरा संकलनासाठी येत्या १८ ऑगस्टपासून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना ‘पिवळ्या कचरापेटी’चे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या कचरा संकलन सेवेसाठी नोंदणीकृत न झालेल्या आस्थापनांना आताही नोंदणी करता येणार आहे. सेवेचा लाभ घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तसेच, मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्स ॲप, तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत आहे. संबंधित क्यूआर कोड स्कॅन करूनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही दिघावकर यांनी सांगितले.