मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान हाती घेतले असून त्या अंतर्गत केवळ १५ दिवसांत १२०० हून अधिक झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रिटीकरण हटविण्यात आले. झाडांवरील फलक, खोडांमध्ये ठोकलेले खिळे, केबल्स काढून झाडांना नवसंजीवनी देण्यात आली. झाडांच्या खोडात ठोकलेले तब्बल ९४.३४ किलो वजनाचे खिळे काढण्यात पालिकेच्या उद्यान खात्याला यश आले. या अभियानात शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
मुंबईतील वृक्षसंपदा अधिक बहरावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी महापालिकेने नुकतेच ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती घेतले होते. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेने २०२२ मध्ये सर्वप्रथम वृक्ष संजीवनी अभियान राबवले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान यशस्वी झाले होते.त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. उद्यान विभागामार्फत पुरेसे मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांसह सुसज्ज पथके पालिकेच्या विविध विभागात तैनात करण्यात आली होती.
या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे फलक, पत्रके, विद्युत तारांचे जंजाळ, वृक्षांच्या बुंध्यालगत केलेले काँक्रीटीकरण काढून टाकण्यात येत आहे. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत १ हजार २९२ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण हटविण्यात आले. तसेच, झाडांच्या खोडात ठोकलेले खिळे, पोस्टर, फलक, केबल्स आदी मिळून एकूण ६ हजार ३०९ गोष्टी काढण्यात आल्या. तसेच, १८७९.१ झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीची भर घालून झाडांना पुरेसे पाणी टाकण्यात आले. सर्वाधिक म्हणजेच ११८ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण २५ एप्रिल रोजी हटविण्यात आले. ३० एप्रिल रोजी एकूण १३.४५ किलो खिळे काढण्यात आले.