गेल्या वर्षभराहून जास्त काळापासून जगभरात करोनाचं थैमान सुरू आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून दुसऱ्या लाटेचा कहर दिसून आला. नव्या करोनाबाधितांसोबतच मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढताना दिसून आला. भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आणि मुंबईत देखील अशीच परिस्थिती दिसून आली. त्यामुळे गेलं जवळपास वर्षभर करोना रुग्णांवर उपचार करणारे, त्यांना आरोग्य सेवा देणारे आरोग्य कर्मचारी देखील प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेस्को कोविड सेंटरमधला आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कोविड सेंटरमधले आरोग्य कर्मचारी सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर फुल्ल ऑन धम्माल डान्स करताना दिसत आहेत! करोना काळातल्या तणावपूर्ण वातावरणात हा डान्स या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण कमी करणाराच ठरला असावा! पण नेमके हे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर का नाचत होते?

गोरेगावच्या कोविड सेंटरचा वाढदिवस!

गोरेगावमध्ये करोनावर उपचार करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्या गोष्टीला २ जून रोजी म्हणजेच बुधवारी एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने एक मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स पीपीई किट घालून सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे सर्व कर्मचारी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्ज-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित पवार कर्जत तालुक्यातल्या गायकरवाडी इथल्या कोविड सेंटरमध्ये तिथल्या रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावरच ठेका धरताना दिसले होते. या रुग्णांशी संवाद साधत यावेळी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला होता. यावेळी त्यांच्यासोबत एका म्हाताऱ्या आजींनीही ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO:…जेव्हा रोहित पवार कोविड सेंटरमध्ये सैराटमधल्या ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतात

करोना काळात सगळीकडेच तणावपूर्ण वातावरण असताना प्रत्यक्ष रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी या थेट करोनाशी प्रत्यक्ष लढा देणाऱ्या दोन घटकांवर सर्वाधिक ताण दिसत आहे. त्यांच्यावरचा ताण कमी करणाऱ्या या दोन घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.