गोवा पोर्तुगिजा’ हॉटेलचे मालक सुहास अवचट यांनी विनयभंग केलेल्या महिलेचे नाव त्यांच्याच एका मैत्रिणीने ट्विटरवर उघड केले आहे. या प्रकरणी या महिलेच्या पतीने सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘गोवा पोर्तुगिजा’ हॉटेलचे मालक सुहास अवचट यांच्या विरोधात माहिम पोलीस ठाण्यात एका महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या महिलेच्या पतीने मंगळवारी सायबर सेल पोलीस ठाण्यात अवचट यांची मैत्रीण रागेश्वरी रघुवंशी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रागेश्वरीने आपल्या पत्नीचे नाव ‘ट्विटर’वर जाहीर केले, असा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार अर्ज प्राप्त झाला असून अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले. अवचट यांच्यावर पाच फेब्रुवारी रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

लाचखोर महसूल अधिकाऱ्यास अटक
मुंबई : महसूल विभागातील गट अधिकारी अशोक कांबळे आणि लोकसेवक हेमंत सावंत यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सोमवारी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे अटक केली. महसूल मंत्र्यांच्या कोर्टात अपील सुनावणी लवकर लागावी यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.  फिर्यादीने अहमदनगर येथील जमिनीच्या नकाशा सुनावणीसाठी अपील केले होते. ते अपील सुनावणीसाठी महसूल मंत्र्यांच्या कोर्टात वर्ग करण्यात आले होते.

स्वस्त घराच्या आमिषाने फसवणूक
मुंबई : स्वस्त दरात सदनिका देतो, असे सांगून तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कुर्ला येथे उघडकीस आले आहे. व्यावसायिक बादशहा मलिक यांना कुल्र्याच्या कोहिनूर सिटी येथे स्वस्तात एक पेंट हाऊस आणि डय़ुप्लेक्स फ्लॅट मिळवून देतो, असे आश्वासन त्यांचा भागीदार अमसद कुरेशी याने दिले होते. सप्टेंबर २०११ ते जानेवारी २०१३ या कालावधीत आरोपी कुरेशी याने मलिक यांच्याकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले होते. ही रक्कम कोहिनूर डेव्हलपर्सला दिल्याच्या खोटय़ा पावत्याही बनवून मलिक यांना दिल्या होत्या. मात्र ही सदनिका त्याने परस्पर विकून टाकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मलिक यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या चोरी विरोधी पथकाने या विरोधात गुन्हा दाखल केला असून फरार कुरेशी याचा शोध सुरू आहे.