तानसा, विहारपाठोपाठ मोडकसागर तलावही ओसंडून वाहू लागला असून मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांमधील जलसाठा ८५.१४ टक्क्यांवर पोहोचला. त्यातच गणेशोत्सव आणि मोहरम जवळ येत आहे. त्यामुळे मुंबईत लागू केलेली २० टक्क्यांपैकी १० टक्के पाणीकपात शुक्रवार, २१ ऑगस्टपासून कमी करण्यात येत असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईकरांना दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जून आणि जुलैमध्ये पावसाने ओढ घेतल्यामुळे तलावांमधील पाणीसाठा आटला होता.

या सातही तलावांमध्ये ३१ जुलै रोजी एकूण ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भविष्यात पावसाने दडी मारली आणि तलावांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकला नाही तर, या चिंतेने पालिकेच्या जल विभागाने ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी घेतला.

या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला.

जलसाठा किती?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरांत पावसाने जोर धरला असून तलाव ८५.१४ टक्के भरले. आजघडीला तलावांमध्ये १२ लाख ३२ हजार ३०२ दशलक्ष लिटर इतके पाणी जमा झाले आहे.

निर्णय का?

मुंबईकरांना वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. तलावांमध्ये यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास मुंबईत पाणीकपात लागू करावी लागते.  २१ ऑगस्ट रोजी मोहरम आहे, तर २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवकाळात मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी २१ ऑगस्टपासून २० पैकी १० टक्के  पाणीकपात मागे घेण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai now has only 10 water cut abn
First published on: 20-08-2020 at 00:27 IST