मुंबई : भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग बुधवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. संबंधित इमारत म्हाडा प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरूच आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ या कालावधीत ३० ठिकाणी झाडे, फांद्या, तसेच, शहरात २, पूर्व उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी घराचा, इमारतीचा भाग तसेच भिंत पडल्याच्या घटना घडल्या.

भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या पाचमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत खुशमा खातूल (३०) आणि नाजिया खान (३५) या महिला जखमी झाल्या. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. तसेच, दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत खुशमा यांची प्रकृती स्थिर आहे, तर नाजिया खान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.