मुंबई : ओशिवरा पोलिसांनी २५ वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल ८९ चोरलेले मोबाइल फोन जप्त केले आहेत. याबाबत आरोपी अक्षय राजू दुगलजने चौकशीदरम्यान कबुली दिली असून गेल्या काही महिन्यांत अंधेरी ते गोरेगाव परिसरातून मोबाईल चोरण्यात आले आहेत. ते सर्व मोबाईल त्याने गोरेगाव येथील एका खोलीत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. आरोपी हे मोबाईल विकण्यासाठी ग्राहक शोधत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार राहुल मिश्रा (३४) हे ओशिवरा येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांचा सुमारे ५० हजार रुपयांचा मोबाईल २८ ऑगस्ट रोजी हॉटेलच्या आवारातून चोरीला गेला होता. त्यांनी शुक्रवारी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक दीपक थोरात यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढला. त्यानुसार पोलीस पथकातील पोलीस हवालदार आनंद पवार, धनंजय जगदाळे, विनोद राठोड यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून तक्रारदाराचा चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला.
दुगलज हा अंधेरी (जोगेश्वरी) येथील आनंद नगर भागात राहतो. त्याच्या घराची झडती घेताना पोलिसांना आणखी सहा मोबाईल फोन मिळाले. पुढील चौकशीत त्याने कबुली दिली की त्याने आनंद नगर (गोरेगाव-पश्चिम), अंधेरी (पश्चिम) आणि बांगूर नगर परिसरातील विविध घरांमधून आणखी ८३ मोबाइल चोरले आहेत. हे सर्व मोबाईल त्याने प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून नाल्याजवळ लपवून ठेवले होते, अशी माहिती ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
आरोपीला अटक करण्यात आले असून, गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकांच्या आधारे त्यांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. मालकांचा शोध लागल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोबाईल त्यांना परत करण्यात येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीचा सुमारे १३ गुन्ह्यांमधील सहभाग उघड झाला आहे. पण आरोपीचा आणखी चोऱ्यांममध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.