महागडा मोबाइल फोन चोरून आणि वर त्याचाच वापर करून एका महिलेला एक लाखाच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या राहुल हिवाळे (२६) या सुशिक्षित बेरोजगार तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. मोबाइलवरील तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा उठवीत राहुलने या महिलेच्या एक वर्षांच्या मुलीचे छायाचित्र फेसबुकवर टाकून एक लाखाची खंडणी मागून कुटुंबीयांना चांगलेच वेठीस धरले होते.
चोरी कधी?
षण्मुखानंद सभागृहात १४ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त ही महिला आली होती. त्या वेळी तिचा महागडा थ्री जी मोबाइल फोन चोरीला गेला. तिने शीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. तिच्या नवऱ्याने संबंधित मोबाइलवर फोन केला तेव्हा समोरील तरुणाने मोबाइल परत हवा असल्यास पाच हजार रुपयांची मागणी केली. या फोनमध्ये महत्त्वाचे दस्तावेज तसेच छायाचित्रे असल्यामुळे त्यांनी त्याची मागणी मान्य केली. दादरमधील एका आइस्क्रीम पार्लरमध्ये एका ठरावीक ठिकाणी पैसे ठेवण्यास सांगून राहुलने मोबाइल फोन घेण्यासाठी ‘सुविधा’ या दुकानाजवळ बोलाविले. मात्र प्रत्यक्षात आइस्क्रीम पार्लरमध्ये ठेवलेले पैसे घेऊन तो फरारी झाला. या महिलेच्या घरातील चित्रण मोबाइलमध्ये होते. त्याचा फायदा उठवीत राहुलने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. याच मोबाइलमध्ये महिलेचे फेसबुक खाते होते. त्यावरून त्याने महिलेच्या एक वर्षांच्या मुलीचे छायाचित्र काढून तिच्याच फेसबुक खात्यावर टाकले आणि संदेश लिहिला.. तिला वाचवा.. यामुळे महिलेचे कुटुंबीय भयभीत झाले. आता मात्र मोबाइल हवा असल्यास राहुलने एक लाख रुपयांची मागणी केली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स, निरीक्षक बाळासाहेब तुपे, साहाय्यक निरीक्षक संजय निकम, दिलीप दैंगाडे आदींच्या पथकाने त्याला अटक केली.
सापळा असा रचला
*गुन्हे अन्वेषण विभागाच्या अँटॉप हिल युनिटने तपास सुरू केला. राहुल वापरत असलेला दुसरा मोबाइल त्याने सीएसटी स्थानकातून चोरल्याचे उघड झाले.
*तेथील सीसीटीव्ही फूटेजवरून राहुलची चेहरेपट्टी नोंदली गेली. मग या महिलेने एक लाख रुपये घेण्यासाठी त्याला चैत्यभूमीजवळ बोलावले.
*या वेळीही गुंगारा देऊन एक लाख रुपये घेऊन पळायचा राहुलचा डाव होता, पण पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
*राहुलने डीएड केले आहे. तंत्रज्ञानात वाकबगार असलेला राहुल मोबाइल चोरून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता, असे स्पष्ट झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2013 रोजी प्रकाशित
मोबाइलचोराचा खंडणीखोरीचा डाव उधळला
महागडा मोबाइल फोन चोरून आणि वर त्याचाच वापर करून एका महिलेला एक लाखाच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या राहुल हिवाळे (२६) या सुशिक्षित बेरोजगार तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

First published on: 24-09-2013 at 01:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police arrest mobile thief who planning to demand extortion money