हरवलेली व्यक्ती सज्ञान असेल तर अनेकदा पोलीसही तिच्या गायब होण्याचा शोध काही काळ घेऊन त्यात अपयश आल्यास ती फाइल बंद करून टाकतात. पण वानखेडे यांच्या प्रकरणातील तपासातून दुसऱ्या एका हत्येचाही छडा लागला..

साहेब, माझे बंधू खरोखरच हरवले आहेत की त्यांचे काही बरेवाईट झाले आहे? अशी विचारणा करीत एक सद्गृहस्थ नेहमी चारकोप पोलीस ठाण्यात येत असत. वर्ष उलटूनही काहीच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झालेले त्यांचे बंधू अशोक वानखेडे यांचे नेमके काय झाले हे त्यांना हवे होते. वानखेडे यांच्या पत्नी आशा यादेखील अधूनमधून पोलीस ठाण्यात येऊन रडवेल्या होत. माझ्या नवऱ्याचा शोध घ्या, अशी विनवणी करीत असत. १५ दिवसांत परत येतो, असे सांगून ते निघून गेल्याचा पत्नीचा दावा होता. परंतु आपले बंधू असे घरातून निघून जाऊच शकत नाही, या संबंधित सद्गृहस्थाच्या दाव्यामुळे पोलिसांनीही ही बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्याचे ठरविले.

उपायुक्त विक्रम देशमाने यांचीही त्यांनी भेट घेतली. काहीतरी गडबड आहे, अशी त्यांचीही खात्री पटली. वानखेडेंचे नेमके काय झाले याची उकल करायचीच, असे त्यांनीही ठरविले. गुन्हे अन्वेषणात माहीर असलेले मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली चारकोप पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोपट वेळे, बोरिवली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घारगे, उपनिरीक्षक जगताप आदींचे पथक तयार केले. फटांगरे यांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. वानखेडे यांच्या पत्नीने चारकोप पोलीस ठाण्यात एप्रिल २०१६ मध्ये ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चारकोप पोलिसांनी वानखेडे यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पत्नी आशाचा जबाबही नोंदवला. तब्बल दोन-तीन वेळा जबाब नोंदवला. परंतु त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. चारकोप पोलिसांनी त्यावेळी तपासादरम्यान वानखेडे यांचा ठावठिकाणा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात काही विशेष माहिती आढळली नव्हती. अखेर चौकशीची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

फटांगरे यांनी आशाचा दोन-तीन वेळा नोंदविलेला जबाब नजरेखालून घातला. दरम्यान, वानखेडे गायब होण्याच्या आधी आशाच्या ठावठिकाण्याची माहिती मिळविली. जबाबात त्या काहीतरी लपवत आहेत, असे त्यांना राहून राहून वाटत होते. त्यामुळे आशाला त्यांनी चौकशीसाठी बोलाविले. माझ्या नवऱ्याचा शोध घ्या, साहेब.. असेच पालुपद त्या आळवत होत्या. नगरला राहत असलेली बहीण वंदना थोरवे हिच्याकडे गेल्याचे तिच्या ठावठिकाणावरून स्पष्ट होत होते. परंतु जबाबात तो उल्लेख का केला नाही, अशा प्रश्न फटांगरे यांना पडला. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संशय अधिक गडद होत गेला. तिच्या हालचालींवरही पाळत ठेवण्यात आली. तांत्रिक पुराव्यांमुळे या प्रकरणात निश्चितच गोलमाल असल्याचा संशय दाट होत चालला होता.

वंदना तसेच तिच्यासोबत राहत असलेल्या नीलेश सुपेकरलाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले. वानखेडे हरविले त्या काळात या तिघांचा ठावठिकाणा नगर ते मुंबई आणि पुन्हा नगर असा आढळला. तेव्हा फटांगरेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही तरी काळेबेरे आहे याची त्यांना खात्री पटली. आशाला तसेच तिची बहीण वंदना, तिच्यासोबत असलेला नीलेश या तिघांना आळीपाळीने चौकशीसाठी बोलावले. परंतु हाती काहीही लागत नव्हते. आशा तर काही केल्या बोलत नव्हती. परंतु वंदना आणि नीलेश यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनाक्रम उलगडला आणि अशोक वानखेडेंचे नेमके काय झाले याची माहिती उघड झाली होती.

सेवानिवृत्त झालेले वानखेडे हे सतत चारित्र्याबाबत पत्नीवर संशय घेत असत. यावरून त्यांच्यामध्ये अनेकवेळा भांडणेही होत. या भांडणांना कंटाळून त्यांची विवाहित मुले त्यांच्यासोबत राहत नव्हती. नवऱ्याच्या या स्वभावाबाबत हैराण झालेली आशा बहिणीला वारंवार सांगत असे. आपली यातून सुटका कर. तुला मी दोन लाख रुपये देईन, असेही ती सांगत असे. पैशाच्या लालसेने वंदनाने नीलेशसोबत आपल्या भावोजींचाच काटा काढण्याचे ठरविले. वानखेडे हे नगरमध्ये वंदनाच्या घरी मुक्कामास होते. त्यावेळी जेवणातून त्यांना विष देऊन डोक्यावर सळईने प्रहार करून त्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतर एका गोणीत मृतदेह भरून तो नगर-पुणे महामार्गावर एका झुडपात टाकून दिला, असे वंदनाने पोलिसांना सांगितले. फटांगरे यांनी नगर पोलिसांकडे चौकशी केली असता त्या काळात अशा पद्धतीचा एक मृतदेह मिळाल्याचे स्पष्ट झाले. छायाचित्रांवरून तो वानखेडे यांचाच असल्याची खात्री पटली आणि वानखेडेंची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला या हत्येशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा पत्नी आशा करीत होती. परंतु बहिणी आणि तिच्या साथीदाराने जबानी दिल्यानंतर तिचेही बिंग फुटले.

आशाला वंदनासह चार बहिणी होत्या. तिन्ही बहिणींशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांच्या नवऱ्यांशी बोलणे केले. मात्र वंदनाला आपल्या नवऱ्याबाबत काहीही सांगता आले नाही. आमचा घटस्फोट झाला आहे, असे ती सांगू लागली. त्यामुळे घटस्फोटाची कागदपत्रे पोलिसांनी मागितली तेव्हा आमचा तोंडी घटस्फोट झाला आहे, असे तिने सांगितले. मात्र अधिक चौकशीत तिने नवऱ्याच्या हत्येचीही कबुली दिली. नवऱ्याचीही जेवणात विष देऊन हत्या करून त्याचा मृतदेह बीड परिसरात टाकून देण्यात आला होता. त्यानंतर बीड पोलिसांकडे चौकशी करून त्याचीही खात्री पोलिसांनी करून घेतली. हरवलेल्या अशोक वानखेडेंचा शोध घेता घेता दुहेरी हत्या उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले.

निशांत सरवणकर @ndsarwankar

nishant.sarvankar@expressindia.com