गरीब कुटुंबातील व्यक्ती आजारी असून त्याच्यासाठी पैशांची मदत द्या अथवा अमुक स्पर्धेत १० लाखांचे बक्षीस लागले आहे, त्वरित आपल्या बँक खात्यांची माहिती द्या, असे संदेश आपल्या मोबाइलवर अधूनमधून येत असतात. या संदेशाला भुलून अनेकांची आर्थिक फसवणूक होते. याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलने आता या संदेशावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या लघुसंदेशांच्या नोंदी ठेवून त्यांचा माग काढण्यासाठी सायबर सेलने आपली यंत्रणा कामाला लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-मेलद्वारे नोकरीचे आमिष दाखवणारे तसेच लॉटरी व बक्षिसांची प्रलोभने देणारे संदेश हमखास येत असतात. अशा ई-मेलमुळे अनेकांनी आपली जमवलेली आयुष्याची संपत्ती घालवून बसले आहेत. ई-मेलद्वारे व्हायरसचा शिरकाव संगणकात झाल्यानेही बँक खात्यांची माहिती चोरीस गेल्याचे प्रकार घडले आहेत. ई-मेलवर असे संदेश येणे काहीसे कमी झाल्यानंतर आता मोबाइलवरून या प्रकारचे संदेश पाठवून बँकांचे तपशील चोरण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. यातून अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. चोरी करणारे हे लघुसंदेश ‘बल्क एसएमएस’ सेवेचा वापर करून एकाच वेळेस अनेकांना पाठवून देतात आणि वेगवेगळ्या स्वरूपात ते मोबाइलवर येऊन धडकतात. मात्र, आता या संदेशांचा उद्देश हा देखील बँक खात्यांची माहिती किंवा पैसे उकळण्याकरिता होत असल्याचे समोर येत आहे.

एसबीआय व अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पिन क्रमांकांची माहिती गोळा करण्याचा प्रकारही नुकताच घडला. त्यामुळे, बँकांना ग्राहकांची एटीएम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या एटीएममार्फत बँक खात्यांची माहिती मिळवणारी यंत्रणा मोठी असून मोबाइलवर येणाऱ्या फसव्या लघुसंदेश पाठवणाऱ्यांचा उद्देशही असाच असल्याची शंका सायबर गुन्हे पोलिसांना आली आहे. म्हणून त्यांनी मोबाइलधारकांना लघुसंदेशांना उत्तर न देण्याचे तसेच वारंवार असे संदेश आल्यास पोलिसी यंत्रणांना सूचित करण्याचे आवाहन केले आहे.

लघु संदेशांना बळी पडू नका

मोबाइलवर येणाऱ्या लघु संदेशांना बळी न पडता नागरिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अशा संदेशांना प्रत्युत्तर दिल्यास त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. सध्या लघुसंदेशांद्वारे फसवणुकीची कोणतीही तक्रार आमच्याकडे दाखल नसली तरी जेथून हे संदेश येतात त्यांची माहिती गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. ही माहितीसंबंधित यंत्रणांना पोहोचवून आम्ही त्यांचा छडा लावत आहोत. आंतरराष्ट्रीय कार्डवरून येणाऱ्या लघु संदेशांचीदेखील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.

 सचिन पाटील, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे विभाग, मुंबई</strong>

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police keep eyes on small mobile messages
First published on: 22-10-2016 at 02:17 IST