मुंबई पोलीस नागमणीच्या शोधात

प्रभूदास या अमिषाला बळी पडला आणि त्याने पैसे देऊन नागमणी विकत घेतला.

धार्मिक पुस्तकांची विक्री केल्यानंतर त्यातून कथित नागमणी विकत घेऊन तो ५० लाख रुपयांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका भक्ताला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. मलकापूर येथे जाऊन या व्यक्तीने तब्बल १५ लाख रुपयांना हा नागमणी विकत घेतल्याचा दावा केला असून मुंबई पोलीस आता या नागमणीचा शोध घेत आहेत.

जुहू येथील एका प्रतिष्ठित धार्मिक संस्थेत काम करणाऱ्या उध्दव प्रभूदास (४१) याच्याकडे संस्थेची पुस्तके विकण्याचे काम होते.

प्रभूदासने तब्बल १५ हजार पुस्तके विकून १५ लाख रुपये मिळवले होते, परंतु, त्याने हे पैसे संस्थेला परत दिलेच नाहीत.

दरम्यान, प्रभूदासला एक बाबा भेटले त्यांनी माझ्याकडे नागमणी असून बाजारात त्याची किंमत ५० लाख रुपये असून मी तो तुला १५ लाख रुपयांत मिळवून देतो, असे सांगितले. प्रभूदास या अमिषाला बळी पडला आणि त्याने पैसे देऊन नागमणी विकत घेतला.

इथे या संस्थेने प्रभूदासकडे पैशांसाठी तगादा लावला होता. अखेर, प्रभूदास पैसे देत नसल्याचे पाहून संस्थेने थेट जुहू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, १३ मे रोजी पोलिसांनी प्रभूदासला अटक केली. पुस्तकविक्रीतून आलेली रक्कम नागमणी विकत घेण्यासाठी वापरल्याचा दावा प्रभूदास करत असून त्याने नागमणी कोठे दडवून ठेवलाय, याचा तपास जुहू पोलीस करत आहेत.

मलकापूर येथून नेमके कुठून हा नागमणी त्याने विकत घेतला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने प्रभूदासची रवानगी २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai police searching nagamani