मुंबई : महाराष्ट्रातील रंगभूमीच्या दोलायमान परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या, तसेच विचारप्रवर्तक विषयांसाठी ओळखले जाणाऱ्या एनसीपीएच्या प्रतिबिंब मराठी नाट्यमहोत्सवाला येत्या २२ मेपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने तरुण कलावंतांचे प्रयोगशील नाट्याविष्कार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. २२ ते २५ मे या चार दिवसीय नाट्योत्सवात मराठी रंगभूमीतील निवडक दिग्दर्शकांच्या नाटकांसह, वाचन-उपक्रम आणि रंगमंचासंबंधित विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
कलावंतांना प्रोत्साहन देण्यासह त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०१० पासून प्रतिबिंब मराठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एनसीपीएच्या एक्सपेरिमेंटल थिएटर, टाटा थिएटर, जेबीटी संग्रहालयात प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात लोकप्रिय व्यावसायिक नाटके, तसेच अनेक तरुण कलावंतांच्या प्रयोगशील कलाकृती पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध रंगभूमीच्या परंपरेचा वारसा पुढे नेणारी तरुण कलावंत मंडळी नवनवीन विषय मांडणार असून त्यातून जगण्यासंदर्भातील नवे भान व नवा दृष्टिकोन दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल.
शिल्पा कुमार यांच्या सौजन्याने आयोजित या नाट्य महोत्सवात २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संकेत पारखे दिग्दर्शित ‘अलाईव्ह’ नाटक सादर करण्यात येणार आहे. २३ मे रोजी वैभव जोशी दिग्दर्शित सोबतीचा करार या नाटकाचे सादरीकरण होईल. २४ मे रोजी सकाळी ११ ते २.३० या वेळेत दिग्दर्शक सचिन शिंदे अभिनयाची कार्यशाळा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता अमित वझे दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’, तर सायंकाळी ५ वाजता विवेक बेळे दिग्दर्शित ‘ये जो पब्लिक है’ ही नाटके सादर करण्यात येणार आहेत. २५ मे रोजी सकाळी ११ ते २.३० यादरम्यान दिग्दर्शक गीतांजली कुलकर्णी अभियानाचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी, नसेन मी’, प्रतीक्षा खासनीस व निकिता ठुबे दिग्दर्शित ‘तुझी औकात काये’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
यंदाचा प्रतिबंब नाट्य उत्सव कलाकार, थिएटर ग्रुप्स, कार्यशाळा संचालक आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्यासाठी केलेला महत्वाकांक्षी प्रयत्न आहे. विविध विषयांवर भाष्य करणारी नाटके, कार्यशाळा आणि इंस्टॉलेशन्स या उत्सवाचा भाग आहेत. अधिकाधिक थिएटर ग्रुपसना या नाट्य उत्सवात सहभागी करून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, त्यांनी सादर केलेल्या कलाकृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महोत्सवाच्या संचालिका राजेश्री शिंदे यांनी सांगितले.