मुंबईमधील एका ३६ वर्षीय इसमाने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जितेंद्र भाडेकर असल्याचे समजते.

जितेंद्र यांची पत्नी माधवी यांचा जून २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू झाल्यापासून त्यांना नैराश्य आलं होतं. मात्र कुटुंबाच्या सांगण्यानुसार जितेंद्र यांनी डिसेंबर २०२० मध्ये दुसरं लग्न केलं. जितेंद्र हे एका हिऱ्यांच्या कंपनीमध्ये काम करायचे. कांदिवलीमधील चारकोप येथे ते मुलगी, आई आणि भावांसोबत राहत होते, अशं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

रविवारी ते त्यांच्या विलेपार्ले येथील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले. येथील गावठाण परिसरातील डिसोझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये जितेंद्र यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र यांनी विलेपार्ले येथील घरातील भाडेकरु घर सोडून गेल्याने मुलीसहीत मी एकदा घराची पहाणी करुन येतो असं घरच्यांना सांगून ते चारकोपमधील घरातून बाहेर पडलेले. मात्र अनेक तासांनंतरही दोघे घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांना फोन करण्यास सुरुवात केली. अनेकदा फोन करुनही काहीच उत्तर न मिळाल्याने जितेंद्र यांच्या भावाने विलेपार्लेतील घरच्या शेजारी राहणाऱ्यांना फोन करुन चौकशी केली. मात्र शेजऱ्यांनी अनेकदा दरवाजा वाजवूनही दरवाजा उघडला नाही. अखेर शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.

पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा जितेंद्र यांचा देह छताला टकललेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं जिथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं.

जितेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीमध्ये त्यांनी आईचा उल्लेख केलाय. आई मी यासाऱ्या गोष्टींना कंटाळलोय. जगण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधण्याचे मी अनेक प्रयत्न केले पण आता मी थकलोय. मी माझ्या मुलीला मागे सोडू शकत नाही म्हणून तिलाही सोबत घेऊन जातोय, असं या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे. याच चिठ्ठीमध्ये माधवीवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी माझ्यावर अंत्यस्कार करा अशी विनंतीही जितेंद्र यांनी केलीय.

जितेंद्र यांच्या कुटुंबियांना तो तणावाखाली होता असं कधी वाटलच नाही असं म्हटलं आहे. तो रोज कामाला जात होता आणि तणावात असल्याचे कोणतीही चिन्हं दिसत नव्हती असं कुटुंबियांनी म्हटलं आहे.