यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. शेडूंग फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर तीनजण रुग्णालयात अत्यवस्थ आहेत. स्विफ्ट कारला कंटनेरची, तर मर्सिडिजला आयशरने धडक दिली. मर्सिडिजमधून भाजपाचे नगरसेवक प्रवास करत होते. ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी अपघाताच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत प्रवाशांना पुण्याहून मुंबईला विमानतळावर सोडण्यासाठी जात असणाऱ्या स्वीफ्ट कारला कंटेनरने जोराची धडक दिली. कंटेरने वेगात असल्याने कारला जवळपास २०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. सुदैवाने स्विफ्टकारमधून प्रवास करणारे प्रवासी सुखरुप बचावले. तर स्विफ्टचालकाची प्रकृती गंभीर आहे.

स्विफ्ट कंटेनर अपघातानंतर लगेच दुसरा अपघात घडला. पनवेलच्या दिशेनं येत असलेल्या मर्सिडीज कारला आयशर टेम्पोने धडक दिली. अपघातग्रस्त मर्सिडीजमध्ये पनवेल पालिकेतील भाजपाचे नगरसेवक तेजस कांडपिळे हे प्रवास करत होते. या मर्सिडीजमधील नगरसेवक कांडपिळे हे सुखरुप असून, इतर दोन जण ठार झाल्याचे समजते. आयआरबी कंपनीच्या अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पथकाने यावेळी वाहतूक पोलिसांच्या मदतीने इतर प्रवाशांना सुखरुप वाहनांच्या बाहेर काढले. जखमींवर पनवेल येथील अष्टविनायक व एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (वय २६) व पनवेल महापालिकेतील नगरसेवक तेजस कांडपिळे हे इतर दोन सहकाऱ्यांसह अपघातग्रस्तांना मदतीसाठी थांबले होते. त्याचवेळी आयशर टेम्पोने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. यात सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा यांचा मृत्यू झाला असून, हर्षद खुदकर हे जखमी झाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune expressway pune mumbai expressway accident horrible accident two died bmh
First published on: 20-04-2021 at 09:41 IST