मुंबई : मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत एकूण ८८४.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रावरील १ ते २० जूनदरम्यान पावसाची ही नोंद झाली आहे.यंदा मुंबईत लवकर दाखल झालेल्या पावसाने जूनच्या सुरुवातीपासून दडी मारली होती. तब्बल १५ दिवस पावसाने उघडीप दिली. अधूममधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर पावसाने जोर धरला. अनेक भागात संततधार पाऊस कोसळला, तर काही भागात पावसाची रिपरिप सुरू होती.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २० जून या कालावधीत ४७५.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ४०९.४ मिमी पावसाची नोंद झाली. साधारण जूनमध्ये मुंबईत ५०० मिमीच्या आसपास पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी पावसाने पहिले पंधरा दिवस दडी मारली होती. त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे १५ दिवसांची तूट भरून निघाली. कुलाबा येथे १६ जून रोजी १००.४ मिमी आणि १९ जून रोजी १४२.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, मागील दोन दिवस मुंबईत दमदार पाऊस पडत होता. त्यानंतर शुक्रवारी काही भागात अधूनमधून पाऊस पडला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान १ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३२ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यातही दमदार पाऊस

मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याअगोदर वळवाच्या पावसाने जोर धरला होता. मे महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा मोसमी पाऊस मुंबईत २६ मे रोजी दाखल झाला. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी मे २०२५ मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.