३३१ नवे रुग्ण, दहा जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गृहनिर्माण संकुलातील करोना संसर्गाचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. रविवारी मुंबईत ३३१ रुग्णांचे निदान झाले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ३५० च्या खाली आली आहे. तसेच प्रतिदिन बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईत रविवारी ४०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी झालेल्या १० मृत्यूंमध्ये नऊ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यातील आठ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते, तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आणि एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होता.

इमारतीमधील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून रविवारच्या आकडेवारीनुसार, शहरात सध्या ४७ इमारती प्रतिबंधित आहेत. गेल्या रविवारी ही संख्या ६० च्या वर होती. गेल्या २४ तासांत बाधितांच्या संपर्कातील १९५३ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

राज्यात ६४७९ नवे बाधित

राज्यात दिवसभरात करोनाचे ६४७९ नवे रुग्ण आढळले, तर १५७ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दिवसभरात ४११० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७८ हजार ९६२ इतकी आहे. राज्यात दिवसभरात  रायगड १८०, पनवेल शहर १२२, अहमदनगर ८७३, पुणे ५४४, पुणे मनपा २७६, पिंपरी-चिंचवड १७९, सोलापूर ६७३, सातारा ६४२, कोल्हापूर ४८०, कोल्हापूर शहर १२०, सांगली ५९१, सांगली-मिरज-कूपवाड शहर १६३, सिंधुदुर्ग १०५, रत्नागिरी १९६, उस्मानाबाद १२५, बीड २०२ इतकी नवीन रुग्णांची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्य़ात २९० बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात रविवारी २९० करोना रुग्ण आढळून आले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील २९० करोना रुग्णांपैकी नवी मुंबई ७०, ठाणे ६६, कल्याण-डोंबिवली ६६, मिरा भाईंदर २८, ठाणे ग्रामीण २४, बदलापूर १९, अंबरनाथ १०, उल्हासनगर सहा आणि भिवंडीतील एका रुग्णाचा सामावेश आहे. तर पाच मृतांपैकी नवी मुंबई दोन, उल्हासनगर दोन आणि कल्याण-डोंबिवलीतील एकाचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवलीत लसीकरण बंद

ठाणे : कल्याण – डोंबिवली शहरात लशीच्या तुटवडय़ामुळे आज, सोमवारी लसीकरण केंद्रे बंद  राहणार आहेत, तर जिल्ह्य़ातील  ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात मात्र लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.जिल्ह्य़ाला गुरुवारी एक लाख ५१ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्य़ात लसीकरण मोहिमेला शुक्रवारपासून पुन्हा वेग आला आहे. दरम्यान  हा लसमात्रांचा साठा संपल्यामुळे  सोमवारी सर्व केंद्रे बंद राहणार असल्याचे कल्याण – डोंबिवली महापालिका प्रशासनाने सांगितले, तर ठाणे शहरात सोमवारी ५४ केंद्रांवर, भिवंडी शहरात पाच केंद्रांवर, उल्हासनगर शहरात सहा केंद्रांवर, बदलापूर शहरात तीन केंद्रांवर, अंबरनाथ शहरात दोन केंद्रांवर आणि ठाणे ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai reports 331 new covid 19 cases 10 deaths zws
First published on: 02-08-2021 at 02:05 IST