मुंबई : राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने घटत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही एक हजाराच्या खाली गेली आहे. सध्या राज्यात ९६५ रुग्ण उपचाराधीन आहेत. एप्रिल २०२० नंतर प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या इतक्या खाली गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील करोनाची साथ झपाटय़ाने ओसरत असून आता दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या खाली गेली आहे. या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी राज्यात १३९ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारापेक्षाही कमी झाली आहे. पहिली आणि दुसरी लाट ओसरली तरी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली कधीच गेलेली नव्हती. सर्वाधिक २५८ उपचाराधीन रुग्ण मुंबईत, तर त्या खालोखाल पुण्यात २४० आणि ठाण्यामध्ये १४९ रुग्ण आहेत. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या १००च्या खालीच आहे.

मुंबईत ५४ रुग्णांचे नव्याने निदान

मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. गुरुवारी मुंबईत ५४ नवे रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली. नव्याने आढळलेल्या ५४ रुग्णांपैकी केवळ चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या रुग्णालयात केवळ २७ रुग्ण दाखल आहेत.

हे जिल्हे करोनामुक्त

रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा हे जिल्हे करोनामुक्त झाले असून या जिल्ह्यांमध्ये करोनाचा सध्या एकही रुग्ण नाही.

पाचपेक्षाही कमी रुग्ण असलेले जिल्हे

सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, जालना, उस्मानाबाद, अकोला, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अल्प असून उपचाराधीन रुग्णांची संख्या पाचपेक्षाही कमी आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai s active covid 19 cases drop below 1000 zws
First published on: 25-03-2022 at 01:57 IST