मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीवेळी खासगी सुरक्षारक्षक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आल्याने निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षकांची मागणी केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीत कूपर रुग्णालयात तातडीने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षक विभागाकडून प्रत्येक पाळीसाठी आठ अतिरिक्त सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासूनच करण्यात आली.
कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली त्यावेळी खासगी सुरक्षारक्षक हा बघ्याची भूमिका घेऊन उभा होता. मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी रुग्णांच्या नातेवाईकांना पकडत बाहेर काढल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आपत्कालिन विभागासह प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात सोमवारी सकाळी आरोग्य विभागाचे उपायुक्त, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये कूपर रुग्णालयामध्ये तातडीने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश कूपर रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार मंगळवारी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया करून तो शक्य तितक्या लवकर मुंबई महानगरपालिकेकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.
महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षक विभागातून तीन पाळ्यांमध्ये प्रत्येक आठ असे २४ अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सुरक्षारक्षकांची नियुक्ती सोमवारी दुपारच्या पाळीपासूनच करण्यात आली आहे, अशी माहितीही डॉ. देव शेट्टी यांनी दिली.
रुग्णालयामध्ये फलक लावणार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून रुग्णालयामध्ये फलक लावण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्टची माहिती देण्याबरोबरच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये कशा प्रकारे वागावे, डॉक्टरांशी कशाप्रकारे संवाद साधावा याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही डॉ. देव शेट्टी यांनी सांगितले.
