मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळत असतानाही मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा पाच पट अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारत असल्याच्या तक्रारीवरून मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न के. जे. सोमय्या कला व वाणिज्य, एस. के. सोमय्या कला, विज्ञान व वाणिज्य आणि के. जे. सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा पाच पट अधिकचे शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार महाविद्यालयाविरुद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीबाबत सात दिवसांत महाविद्यालय संलग्नता व विकास विभागातील उपकुलसचिवांकडे खुलासा सादर करावा’, असे मुंबई विद्यापीठाने सोमय्या महाविद्यालयाला पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीशीत नमूद केले आहे.

हेही वाचा – उपनिबंधक कार्यालयांच्या मनमानीमुळे सहकारी गृहनिर्माण संस्था हैराण! प्रशासक नियुक्ती, अपात्रतेच्या नोटिसांमध्ये अधिक रस

हेही वाचा – ‘महारेल’च्या व्यवस्थापकीय संचालकांची मुदतवाढ वादाच्या भोवऱ्यात! नवी नियुक्ती करणे अपरिहार्य

‘राज्य शासन व विद्यापीठाच्या परवानगीशिवाय अतिरिक्त शुल्क घेणे हा भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. वसूल केलेले अधिकचे शिक्षण शुल्क तातडीने विद्यार्थ्यांना परत करावे’, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमय्याच्या व्यवस्थापनाचे म्हणणे काय?

आमच्या महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क आराखड्यात केलेल्या सुधारणा नियमांप्रमाणे आणि मुंबई विद्यापीठाच्या प्रक्रियेनुसारच आहेत. आमच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी व पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमची महाविद्यालये तक्रारींत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांबाबत विद्यापीठाकडे तपशीलवार उत्तर सादर करतील, असे सोमय्या विद्याविहार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.