मालेगाव बॉम्बस्फोट खटला : सुनावणीस हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल लागेपर्यंत सुनावणीला कायमस्वरूपी अनुपस्थित राहू देण्याची मुख्य आरोपी आणि खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची मागणी मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीला प्रज्ञासिंह यांना उपस्थित राहावे लागणार आहे.
प्रज्ञासिंह यांच्यासह खटल्यातील सगळ्या आरोपींना न्यायालयाने आठवडय़ातून एकदा सुनावणीला हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. खटल्याला कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज ठाकूर यांनी वकील जे. पी. मिश्रा यांच्यामार्फत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर गुरुवारी केला होता. आपण विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त आहोत. शिवाय आपण साध्वी आहोत. त्यामुळे साधनेसाठी आपल्याला कठोर शिस्तीचे पालन करावे लागते, आहाराचे नियम पाळावे लागतात. त्याचप्रमाणे खासदार म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत. त्यातच संसदेचे अधिवेशन सुरू असून पक्षाने सगळ्या खासदारांना त्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत. या सगळ्याचा विचार करता खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी भोपाळ ते मुंबई आणि मुंबई ते भोपाळ असा प्रवास करणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत सुनावणीला कायमस्वरूपी अनुपस्थित राहू द्यावे, अशी मागणी साध्वी यांनी केली होती.
प्रज्ञासिंह यांनी सुनावणीला अनुपस्थित राहण्यासाठी दिलेली कारणे वाजवी आणि पुरेशी नाहीत, असे स्पष्ट करत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. पाडळकर यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर संसदेचे अधिवेशन २६ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. निदान तोपर्यंत तरी सुनावणीला अनुपस्थित राहण्यास परवानगी द्या, अशी मागणी ठाकूर यांच्या वकिलांनी केली. ती मागणीही न्यायालयाने फेटाळली.
* प्रज्ञासिंह १५ दिवसांपूर्वीच न्यायालयासमोर हजर झाल्या होत्या. त्यांनी न्यायालयातील धुळीच्या वातावरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याचा दाखला देत न्यायालयाने या वेळी प्रज्ञासिंह यांच्या वकिलांना फटकारले.