scorecardresearch

मुंबई : उपनगरवासियांना पाण्यासाठी सायंकाळी ६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा सोमवारी २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता.

water supply close
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा सोमवारी २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र जल अभियंता खात्याने हाती घेतलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ न शकल्यामुळे २४ तासांनंतर उपनगरांतील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आले आहे. उपनगरवासियांना मंगळवारी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र आता मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे  ३० जानेवारी  सकाळी १०:०० पासून  ३१ जानेवारी रोजी सकाळी १०:०० पर्यंत भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जल वाहिनी जोडणे, २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे आणि इतर संलग्न कामे हाती घेण्यात आली होती. या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा >>> चुनाभट्टीत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

ही सर्व कामे पूर्ण करीत असताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे उपरोक्त कामे पूर्ण करून १,९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र, केंद्रापर्यंत येणाऱ्या व केंद्रापासून पुढे जाणाऱ्या सर्व जलवाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आठ तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. या कामांमुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व, पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, वांद्रे पूर्व व पश्चिम या नऊ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. तर पूर्व उपनगरातील भांडूप, घाटकोपर, कुर्ला येथील अनेक भागात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित आहे.

हेही वाचा >>> ‘म्हाडा’च्या हातोडय़ाआधी पाडकाम; अनिल परब यांचे वांद्रय़ातील अवैध बांधकाम

तर दादर, माहीम पश्चिम,  प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ यादरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी २०२३ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. बाधित झालेल्या भागांचा पाणीपुरवठा मंगळवार, ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता पूर्ववत करण्यात येणा होता. मात्र आता तो मंगळवारी संध्याकाळी ६:०० पासून पूर्वरत होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:32 IST
ताज्या बातम्या