मुंबई : जोगेश्वरी ते विक्रोळी जोडरस्त्यावरील (जेव्हीएलआर) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शनिवारी पूर्व द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे अतोनात हाल झाले. हा उड्डाणपूल दहा दिवस बंद राहणार असल्याने वाहनचालकांची रखडपट्टी होण्याची शक्यता आहे.    

जेव्हीएलआर उड्डाणपुलाची दुरुस्ती शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या कामासाठी पूल शनिवारी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या प्रचंड कोंडीत वाहने अडकून पडली. शनिवारी सकाळपासूनच विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाशी, ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावल्याने उन्हाच्या काहिलीने प्रवाशांचा जीव कासावीस झाला. ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरही अशीच वाहनकोंडी झाली होती. विक्रोळीपासून पुढे घाटकोपर, कुल्र्यापर्यंत येताना तसेच जोगेश्वरीच्या दिशेने जाताना वाहनांना एक ते दीड तास लागत होता. त्याचा फटका ठाणे आणि नवी मुंबईहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक वाहन चालकांना बसला. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील उड्डाणपूल १० दिवस बंद राहणार आहे. या उड्डाणपुलाचे सांधे भरण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले असून ते २४ मेपर्यंत चालणार आहे. या काळात पूल पूर्णत: बंद असेल. उड्डाणपुलाखालून  मात्र वाहतूक सुरू राहणार आहे.

रुग्णवाहिकाही अडकल्या

वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिकांना वाट करून देणे कठीण झाले होते. काही रुग्णावाहिकांमधील रुग्णांचे नातलग अक्षरश: हात जोडून मार्ग करून देण्याची विनंती करताना दिसत होते.

दहा दिवस त्रासाचे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील हा उड्डाणपूल दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे २४ मेपर्यंत प्रवासी आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागेल. आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने सोमवारी या ठिकाणी आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.