मुंबई : खाण्याची, गिळण्याची आणि श्वास घेण्याची क्षमता गमावलेल्या एका २० वर्षांच्या मुलावर मुंबईतील रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर त्याने सुखाचा घास घेतला. एका अपघातानंतर सलग दोन वर्षे त्याला काहीही गिळता येत नव्हते. मात्र डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेने त्याला नवजीवन मिळाले आहे.
नागपूर येथे राहणाऱ्या तौहिद खानचा (२०) डिसेंबर २०२२ मध्ये सायकल चालवताना गंभीर अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या अन्ननलिकेला छिद्र पडले होते. नागपुरात त्याच्यावर उपचार करण्यात आले, परंतु त्याच्या उजव्या फुफ्फुसात एम्पायमा नावाचा संसर्ग झाल्याने गुंतागूंत झाली होती. या संसर्गावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी फुफ्फुसांची शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्यांनी अन्ननलिकेतील छिद्र बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही आराम मिळाला नाही. त्यानंतर अन्ननलिकेतून होणारी गळती रोखण्यासाठी एंडोस्कोपिक स्टेंट बसवण्यात आला, परंतु तोही प्रयत्न अयशस्वी ठरला.
प्रत्येक वेळी घास गिळताना त्याची लाळ श्वसननलिकेतून गळून फुफ्फुसांपर्यंत जात असल्याने त्याला सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याने अनेक रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईतील एका रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला. तेव्हा त्याची प्रकृती खूपच खालावली होती. त्याचे वजन ६० किलोवरून ३३ किलो झाले होते. शरीरात पसरलेल्या सेप्सिस संसर्गाशी तो झुंजत होता, त्याच्या फुफ्फुसांचे कार्य मंदावले होते.
वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, जीआय आणि रोबोटिक सर्जन डॉ. रॉय पाटणकर यांनी त्याची तपासणी केल्यानंतर ओजीडीस्कोपीमध्ये अन्ननलिका आणि श्वसनलिकेमध्ये असामान्यता दिसून आली. त्यामुळे त्याचे पोषण सुधारण्यास मदत करण्यासाठी लहान आतड्यात एक फीडिंग ट्यूब बसविण्यात आली. पुढील सहा महिन्यांत त्याची तब्येत हळूहळू स्थिर झाली. त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसताच मार्च २०२५ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. डॉ. रॉय पाटणकर, ऑन्को सर्जन डॉ. तनवीर माजिद, भूलतज्ज्ञ डॉ. प्रमोद काळे आणि डॉ. विकास नायर यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या तुकडीने त्याच्यावर फीडिंग जेजुनोस्टोमी शस्त्रक्रिया केली.
यामध्ये लहान आतड्यांमध्ये बसवलेल्या नळीमुळे त्याला योग्य पोषण आणि औषधे खाण्यास मदत झाली. त्यानंतर त्याची श्वसननलिका आणि अन्ननलिकेतील छिद्रावर आठ तासांची जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. स्टर्नोक्लेइडोमास्टॉइड नावाचा एक मोठा मानेजवळचा स्नायू काळजीपूर्वक वेगळा करून अन्ननलिका आणि श्वासनलिकेमध्ये बसविण्यात आला. हा स्नायू, त्याच्या स्वतःच्या रक्तपुरवठ्यासह, भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी संरक्षणात्मक अडथळा म्हणून काम करतो, ही पद्धत मस्क्युलर फ्लॅप प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. तौहिदला स्थिर होण्यापूर्वी पाच दिवस जीवन प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले. आता त्याला घरी पाठविण्याच आले आहे. तो तोंडावाटे अन्न गिळण्यास सक्षम आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन त्याचे वजनही वाढत आहे. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचे डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.
डॉ. रॉय आणि त्यांच्या पथकाने माझ्या मुलाचा जीव वाचवून आम्हाला अमूल्य भेट दिली. दोन वर्षांच्या संघर्षानंतर तो अखेर बरा होत आहे – नसीम खान, तौहिदचे वडील