मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) उर्वरित काम वेगात पूर्ण करत जुलैअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे. जुलैमध्ये हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धीने आठ तासात करता येणार आहे. सद्या:स्थितीत महामार्गातील भरवीर ते इगतपुरी अशा २५ टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून, आजपासून (३ मार्च) हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबईत का जाणवतोय गारवा ? पुढील दोन दिवस …
राज्याच्या राजधानीला आणि उपराजधानीला जोडण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गातील नागपूर ते भरवीर असा ६०० किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे, तसेच भरवीर ते इगतपुरी असा २५ किमीचा टप्पा सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
आतापर्यंत भरवीर ते आमणे या ७५ किमी टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. इगतपुरी ते आमणे टप्प्यातील एका मोठ्या पुलाचे काम आता शिल्लक आहे. हे काम पूर्ण करत जुलैमध्ये या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यास हा टप्पा तात्काळ कार्यान्वित केला जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
समृद्धी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एमएसआरडीसीकडून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग समृध्दीपेक्षा १०० किमी लांब आहे. या महामार्गामुळे १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. तसेच, नागपूर ते गोवा अंतर १० ते ११ तासात पूर्ण करता येणार आहे.