मुंबई : परीक्षांचे रखडलेले निकाल असो किंवा विस्कळीत झालेले वेळापत्रक, मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना सातत्याने फटका बसत आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विधी शाखा पदव्युत्तर प्रथम वर्षातील द्वितीय सत्राची परीक्षा (एलएलएम) १० ते १८ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडली. परंतु ३ मार्च रोजी ४५ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपूर्णतः विस्कळीत झाले असून, पदव्युत्तर द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात युवासेना उपसचिव ॲड. सचिन पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांना पत्र पाठवून तात्काळ निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन देताच गिरणी कामगारांचा मोर्चा स्थगित
‘मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधी महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विधी शाखेचे रखडलेले निकाल तात्काळ जाहीर करण्यात येतील आणि यानंतर महाविद्यालयीन स्तरावर विधी शाखा पदव्युत्तर द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सांगितले आहे.
शैक्षणिक वेळापत्रक संपूर्णतः विस्कळीत
‘आम्ही शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील विधी शाखा पदव्युत्तरचे विद्यार्थी आहोत. मे – जून २०२२ या काळात अपेक्षित असलेली द्वितीय सत्राची परीक्षा करोनामुळे विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे ७ महिने उशीरा जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आली. हा अभ्यासक्रम जुलै २०२३ मध्ये संपणे अपेक्षित आहे, परंतु अद्याप प्रथम वर्षातील द्वितीय सत्र परीक्षेचे निकाल जाहीर न झाल्यामुळे आमच्या तासिका सुरू होऊनही अधिकृतरित्या पदव्युत्तर द्वितीय वर्षाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. आधीच आमचे शैक्षणिक वेळापत्रक संपूर्णतः विस्कळीत झालेले असताना, मुंबई विद्यापीठ निकाल जाहीर करण्यात दिरंगाई का करीत आहे? यामुळे आम्हाला आता भविष्याची चिंता वाटू लागली आहे’, अशी खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.