निकालानंतर आता परीक्षेच्या नियोजनात घोळ

जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका

( संग्रहीत छायाचित्र )

जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका

निकालातील घोळानंतर आता मुंबई विद्यापीठाचे पुढील परीक्षांच्या नियोजनातही गोंधळ सुरू झाले आहेत. जुन्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप, पुनपरीक्षार्थीना प्रवेशपत्र न मिळणे अशा गोंधळांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

निकालातील गोंधळाने जेरीस आलेल्या विद्यार्थ्यांना आता सत्र परीक्षांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका बसू लागला आहे. सध्या विज्ञान, कला आणि इतर शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची (टी. वाय. बी.एससी) जैव रसायनशास्त्र विषयाची परीक्षा होती. जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्र होते. परीक्षे दरम्यान शुक्रवारी जुन्या अभ्यासक्रमाच्या (२०१४-१५) विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला प्रश्नपत्रिका बदलून दिली जाईल असे पर्यवेक्षकांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका मिळाल्याच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्धवट सोडावी लागली. याबाबत विशाल आयरे या विद्यार्थ्यांने सांगितले, ‘जुना अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा होता. आम्हाला नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातील काही भाग सारखा असला तरी बहुतेक प्रश्न हे आमच्यासाठी अभ्यासक्रमाबाहेरील होते. त्याबाबत परीक्षा केंद्राकडे तक्रार केल्यानंतर या प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा देऊ नका असे सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षा अर्धवट सोडावी लागली. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. जुन्या अभ्यासक्रमाचे आम्ही आठ ते दहा विद्यार्थी वर्गात होतो.’

कला अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. कला शाखेच्या परीक्षा सुरूही झाल्या आहेत. मात्र, जुन्या मूल्यांकन पद्धतीनुसार (६०-४०) परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षेची प्रवेश पत्रे मिळालेली नाहीत.‘नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा एकत्र असते. मात्र या परीक्षेचे प्रवेश पत्रच मिळू शकले नाही. ज्या महाविद्यालयातून अर्ज भरला आहे त्या महाविद्यालयातून विद्यापीठाकडे चौकशी करा असे सांगितले आहे. विद्यापीठाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. गेल्यावेळीही परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्र मिळाल्यामुळे परीक्षा देता आली नव्हती, असे प्रदीप या विद्यार्थ्यांने सांगितले.

विधी अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर

मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुल येथे गुरुवारी विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शने केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली असून पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची आणि तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्राच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला. नवनियुक्त प्रकुलगुरू प्रा. व्ही. एन. मगरे यांनी गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तात्काळ निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन प्रा. मगरे यांनी दिले. विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याबाबत मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.  पुनर्मुल्यांकनाचा निकाल दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे स्टुडंट्स लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai university trouble in the exam schedule

ताज्या बातम्या