मुंबईतील पायधूनीमधून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या एका एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली असून अल्ताफ कुरेशी असे या एजंटचे नाव आहे. अल्ताफकडून पोलिसांनी ७० लाख रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला मुंबईतील आयएसआय एजंटची माहिती मिळाली होती. यानुसार बुधवारी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त मोहीम राबवत अल्ताफ कुरेशी या एजंटला अटक केली. अल्ताफ हा मूळचा गुजरातचा असून तो मुंबईत हवाला रॅकेट चालवत होता.

उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये बुधवारी पोलिसांनी आयएसआयच्या एजंटला अटक केली होती. आफताब अली असे या एजंटचे नाव आहे. आयएसआयच्या निर्देशानुसार हवाला रॅकेट चालवणाऱ्या अल्ताफने आफताबच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. आयएसआयला माहिती पुरवणाऱ्या हेरांना पैसे देण्याचे काम अल्ताफ करत होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशातून अटक झालेल्या आफताब अली याने पाकिस्तानात आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याच्या संपर्कात होता अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. आफताबसंबंधी पुरेसे पुरावे हाती लागलेले आहेत. त्याच्या मोबाईल फोनद्वारे नवी माहिती हाती लागेल आणि आणखी काही जणांना अटक होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.