Mumbai Woman Duped by Cyber Fraudsters: ऑनलाईन फसवणुकीला बळी पडल्यामुळे अनेकांचं लाखोंचं तर काहींचं कोट्यवधींचं नुकसान होत असल्याच्या घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यात वेबसाईटवरील लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्यापासून फोनवर कार्डचा किंवा बँक व्यवहाराचा ओटीपी मागण्यापर्यंत अनेक मार्गांचा समावेश आहे. पण आता या ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार समो आला आहे. मुंबईत एका वृद्ध महिलेला चक्क पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करून तब्बल २२ लाखांना गंडा घातल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. अशा प्रकारे हेरगिरीचा आरोप करून फसवूक केल्याचा हा पहिलाच प्रकार मानला जात आहे.
नेमकं घडलं काय?
मुंबईत एका ६४ वर्षांच्या वृद्ध महिलेची पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करून तब्बल २२ लाख ४० हजारांची फसवणूक केली आहे. बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. सदर महिला गिरगावमध्ये वास्तव्यास असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं गेल्या आठवड्यात यासंदर्भात साऊथ रीजन सायबर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर बुधवारी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर हे सगळं प्रकरण चर्चेत आलं आहे. ५ ते १० जून यादरम्यान हे सर्व फोन कॉल्स आणि फसवणूक झाल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
सदर महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, काही अनोळखी क्रमांकांवरून त्यांना फोन आले. आपण दिल्ली एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी प्रेम कुमार गुप्ता बोलत असल्याचं पलीकडील व्यक्तीने सांगितलं. तसेच, आपण जम्मू-काश्मीर बॉर्डर पोलीस स्थानकात सध्या रुजू असल्याचंही या व्यक्तीने सांगितलं. तुमच्याविरोधात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याची तक्रार दाखल झाली असल्याचा दावा सदरील व्यक्तीने केला.
तुरुंगवास व आर्थिक दंडाची भीती
दरम्यान, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने नंतर या महिलेला शिक्षेचीही भीती घालायला सुरुवात केली. हेरगिरीच्या गुन्ह्यात तुम्हाला १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांपर्यंत आर्थिक दंड होऊ शकतो, असं सांगितलं. तसेच, एका ओळखपत्राचा फोटोदेखील ते आपलंच पोलीस अधिकारी असल्याचं ओळखपत्र असल्याचं सांगून पाठवला.
कारवाईच्या भीतीपोटी महिलेनं फोनवरील व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल २२ लाख ४० हजारांची रक्कम जमा केली. ५ ते १० जून या काळात हे पैसे ट्रान्स्फर केले गेले. पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर तक्रारदार महिलेला एकही फोन आला नाही. नंतर आपली फसवणूक झाल्याचं सदर महिलेच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.